लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव मार्गावरचे प्रमुख स्थानक असलेल्या नंदुरबार रेल्वेस्थानकातून लाॅकडाऊनपूर्वी ३२ प्रवासी गाड्या सुरू होत्या. या गाड्या गेल्या सात महिन्यांपासून बंद असून सध्या आठवडाभरात केवळ १५ रेल्वे गाड्या धावत आहेत. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर पूर्वपदावर येत असलेल्या प्रवासी वाहतूक व्यवस्थेत रेल्वे अग्रक्रमावर आहे. यातून सात महिन्यांपासून प्रमुख रेल्वेगाड्या बंद असल्याने गुजरातमध्ये जाणारे तसेच गुजरातमधून येणार्यांना अडचणी येत आहेत. यावर मार्ग म्हणून रेल्वेकडून येत्या २५ पासून आणखी दोन गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॅसेंजर गाड्यांबाबत अद्याप निर्णय नसला तरी दिवाळीनंतर सुरत-भुसावळ पॅसेंजर गाड्या सुरू होतील अशी शक्यता रेल्वेतील सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान गुरुवारी नंदुरबार रेल्वेस्थानकात रेल्वेचे डीआरएम जी.व्ही.एल.सत्यकुमार यांनी भेट देत माहिती घेतली. यावेळी रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाची त्यांनी पाहणी करुन अधिकार्यांसोबत संवाद साधला. यावेळी खासदार डाॅ. हीना गावीत यांनीही त्यांची भेटी घेतली. खासदार डाॅ. गावीत यांनी रेल्वेगाड्या वाढीसह प्रवाशी वाढीसाठी करण्यात येणार्या उपाययोजनांवर चर्चा केल्याची माहिती देण्यात आली आहे. रेल्वेस्थानकातील विविध सोयी सुविधांचा डीआएम सत्यकुमार यांनी आढावा घेतला. नंदुरबार रेल्वेस्थानकातून सध्या अहमदाबाद-हावडा, मुजफ्फरपूर-अहमदाबाद, गोरखपूर-अहमदाबाद आणि छपरा-सुरत या चार गाड्या दररोज सुरू आहेत. या व्यतिरिक्त कोरोना रुग्ण तसेच आपात्कालीन स्थितीसाठी सुरू करण्यात आलेल्या ११ गाड्या चालवण्यात येत आहेत. यात हावडा कोविड एक्सप्रेस, गांधीधाम-खुर्दा रोड, द्वारका कोविड एक्सप्रेस यासह इतर गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांमधून प्रवास करत नंदुरबार स्थानकात येणार्या प्रवाशांची आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांकडून तपासणी करण्यात येत आहे. गेल्या सात महिन्यात बंद असलेल्या रेल्वेगाड्यांमुळे नंदुरबार रेल्वेस्थानकातून प्रवासी भाड्याचे २० कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. गाड्या सुरू झाल्यानंतर अवलंबून असलेले उद्योगही पुन्हा सुरू होवून कामगारांना रोजगार मिळणार आहे.
आठवडाभर चालतात केवळ १५ रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 13:14 IST