नंदुरबार : मंगळवारपासून शैक्षणिक सत्र सुरू होत असले तरी प्रत्यक्षात शाळा भरणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शालेय वेळेत शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण द्यावे, असेही काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शिक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुस्तके वाटप करण्यात येणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर ऑनलाइन पुस्तकांची लिंक शेअर करून लागलीच तासिकांप्रमाणे ऑनलाइन शिक्षण सुरू केले जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थी राहू नये यासाठी शिक्षकांनी गावात फिरून सर्व विद्यार्थ्यांची नावे शाळेत दाखल करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे.
सोमवारी अनेक शाळांनी शिक्षकांना बोलावून घेतले होते. शाळा सफाई आणि सॅनिटायझेशन करण्यावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना एक झाड लावण्याचा उपक्रम देण्यात आला असून, त्याचे फोटो काढून त्यानुसार पर्यावरण विषयात गुणदान केले जाणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांनी सांगितले.