यावेळी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे महाव्यवस्थापक डाॅ. वाय.जी.प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. डाॅ. प्रसाद यांनी चांगल्या कापूस उत्पादनासाठी गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड रोगाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करुन विविध विषयांवर संवाद साधला. परिसंवादात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, यांनी जिल्ह्यातील या प्रमुख पिकात अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी या परिषदेतील मार्गदर्शनाचा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले.
राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभागीय विस्तार केंद्राचे प्रमुख डॉ.मुरलीधर महाजन यांनी संतुलित खतांचा वापर व. एकरी झाडांची संख्या महत्त्वाची असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण,लागवडीचे अंतर, फर्टीगेशन तंत्रज्ञान,सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची कापूस पिकात दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय याबाबतही डाॅ. महाजन यांनी मार्गदर्शन केले.
परिसंवादात भारतीय किसान संघाचे राज्य संघटन मंत्री दादा लाड यांनी कापूस पिकात दोन प्रकारच्या फांद्या असून त्याचे नियमन करण्याचे आवाहन केले. गळ फांद्या ज्या अनावश्यक असतात व फळ ,फांद्या ज्याद्वारे चांगले उत्पादन मिळते त्या ओळखून झाडावर कशा ठेवाव्या याबद्दल मार्गदर्शन केले. परिसंवादात केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. चिन्ना बाबू नायक यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनामध्ये कमी दिवसाच्या वाणांची लागवड, नियमित सर्वेक्षण, ट्रायकोकार्डचा वापर व कीटकनाशकांचा शिफारशीनुसार वापर करण्याचे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ञ पद्माकर कुंदे यांनी कपसातील प्रमुख रोग जीवनुजन्य करपा ,दहिया तसेच आकस्मिक मर व लाल्या या विकृतींचे व्यवस्थापन याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. या ऑनलाईन कार्यक्रमाचे संचालन कृषी अभियंता .जयंत उत्तरवार, उमेश पाटील यांनी केले. परिसंवादात शेतकरी सहभागी झाले होते.