नंदुरबार : पंचकमिटीत मुद्दा मांडल्याच्या वादातून चाैघांनी एकास दगड मारून जखमी केल्याची घटना केलीपाणी, ता. तळोदा येथे घडली. चौघांवर धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, केलीपाणी येथे गावातील वादातून पंचकमिटीची बैठक घेण्यात आली होती. त्यात सायसिंग शंकर पटले, रा. विहिरमळ्यापाडा, ता. तळोदा हा आपला मुद्दा मांडत होता. त्याने मांडलेला मुद्दा हा खिमीजी खीमा वळवी, रा.खामला यांच्या जिव्हारी लागला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. खिमीजी खीमा वळवी, रा.खामला, धनजी फुरता ठाकरे, गोवा तेजला ठाकरे व दिवणा धनजी ठाकरे रा.केलीपाणी यांनी हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच गोवा ठाकरे याने दगड मारून डोके फोडले. याबाबत सायसिंग पटले यांनी फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार गावीत करीत आहेत.