लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील अक्राळे येथे अफूची शेती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने छापा टाकून झाडे जप्त केली होती. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान यातील अटक केलेल्या आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.अक्राळे येथील ज्ञानेश्वर जगन रजाळे (धनगर) व कृष्णा गोवा धनगर या दोघांनी त्यांच्या शेतात अफूची झाडे लावली होती. दोघांचे एकत्रित वजन केल्यानंतर ते ५०५ किलोग्रॅम एवढे भरले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर रजाळे याला ताब्यात घेतले होते. त्याला सोमवारी सकाळी नंदुरबार जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील दुसरा आरोपी कृष्णा धनगर हा फरार आहे. त्याचा पथकाकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान तालुक्यात प्रथमच अफूची शेती उजेडात आल्याची माहिती आहे. या पिकाची लागवड करण्यासाठी संशयितांनी कोणाची मदत घेतली तसेच या उत्पादनाची विक्री ते नेमके कोणाला करणार याचा पोलिसांकडून शोध घेतला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेली अफूची झाडे तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आली असून न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांची विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अफू शेती प्रकरण-एकास पोलीस कोठडी तर दुस-याचा शोध सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 13:03 IST