जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेले सर्व अधिकारी यांच्या विचारविनिमयातून, तसेच जिल्ह्यातील शिक्षकांकडून शिक्षण परिषदांमध्ये भरण्यात आलेल्या प्रतिसाद लिंकच्या माध्यमातून मागणी केलेल्या विषयांचा विचार करून, पुढील शिक्षण परिषदेमध्ये घ्यावयाच्या विषयांबाबत विषयपत्रिका नियोजन केले जाते. सर्व विषयांच्या पीपीटी तयार केल्या जातात, तसेच विषयाच्या अनुषंगाने विविध संदर्भ साहित्य तयार केले जाते. तयार केलेले सर्व विषय साहित्य केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांसाठी उपलब्ध करून दिले जाते. प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, तसेच ग्यानप्रकाश फाउंडेशन, तालुक्याचे सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख व सीआरजी सदस्य या सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ९५ केंद्रावर या शिक्षण परिषदांचे ऑनलाइन पद्धतीने यशस्वी आयोजन करण्यात येते. ऑनलाइन शिक्षण परिषदांमध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांना तब्बल दोन तास विविध विषयांची माहिती दिली जाते. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी शिक्षक मोबाइल किंवा संगणकासमोर बसून असतात. या वेळेत विरंगुळा म्हणून किंवा मेंदूला वेगळे खाद्य म्हणून, नंदुरबार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य डॉ.जे.ओ. भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिक्षण परिषदेच्या विषयप्रमुख डॉ.वनमाला पवार व विषय सहायक संदीप पाटील व प्रकाश भामरे यांच्या नियोजनाने जिल्ह्यात शिक्षण परिषदांमध्ये वन मिनिट ब्रेकचे आयोजन करण्यात आले. या ‘वन मिनिट गुड ब्रेक’मुळे शिक्षकांना शिक्षण परिषदेत एकाग्र होण्यासाठी मदत झाली. सर्व शिक्षकांनी वन मिनिट ब्रेक हा उपक्रम उत्तम असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
शिक्षण परिषदेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व शिक्षण क्षेत्रामध्ये सद्यस्थितीबाबत असलेल्या नवनवीन योजना, नवनवीन बाबी या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. शिक्षण परिषदेतील सर्व विषयांचे यशस्वीपणे संचालन करण्यामध्ये जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभते. शिक्षण परिषदांचे नियंत्रण व शिक्षण परिषदांमधील विषय नियोजनानुसार घेण्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील वरीष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण, रमेश चौधरी, तसेच अधिव्याख्याता बी.आर. पाटील, पंढरीनाथ जाधव, डॉ.संदीप मुळे, विषय सहायक देवेंद्र बोरसे, उदय केदार, अलका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय शिक्षण परिषदा संपन्न होतात. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी व विषय सहायक शिक्षण परिषदांना उपस्थित राहून शिक्षण परिषदा गुणवत्तापूर्ण होण्यासाठी मेहनत घेत असतात.