नंदुरबार : तालुक्यातील कोळदे गावाजवळ पिंपळोद येथून सोयाबीन भरून निघालेला ट्रॅक्टर उलटल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
बामनभाई मक्कनभाई पाडवी (वय ४५, रा. पिंपळोद ता. निझर जि. तापी) असे मृताचे नाव आहे. बामनभाई हा मंगळवारी जीसीएक्स ९१०२ हा ट्रॅक्टर घेऊन नंदुरबार बाजार समितीत सोयाबीन भरून येत होता. कोळदे मार्गाने येत असताना कृषी विज्ञान केंद्राजवळ असलेल्या फरशीवर त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने ते थेट चारीत जाऊन उलटले. यात चालक बामनभाई हा जागीच ठार झाला. यावेळी त्याच्यासोबत असलेला एकजण दाबला जाऊन गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हा ट्रॅक्टर पिंपळोद येथील शरद शंकर पटेल यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले असून शेतमालही त्यांचा होता अशी माहिती आहे. दरम्यान, अपघातानंतर बचावकार्यासाठी कोळदा येथील नागरिकांनी धाव घेतली होती. जखमीला नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना करून त्याचा जीव वाचवण्यास मदत केली.