लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : देवमोगरा येथील यात्रेला जाणाऱ्या जीपगाडी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर पाचजण जखमी झाल्याची घटना प्रकाशा येथील वैजाली चौफुुलीवर घडली. याप्रकरणी शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.काशिनाथ शंकर चौधरी (वय ७१) रा.प्रकाशा असे मयताचे नाव असून लाडकीबाई पावरा, विनाबाई नारायण पावरा, ललिता सिंगा बर्डे, नारायण गणा पावरा, महेश नारायण पावरा सर्व रा.मालकातर, ता.शिरपूर असे जखमींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मालकातर, ता.शिरपूर येथील भाविक जीपगाडीने (क्रमांक एम.पी.४६ बी.ए. ४६३८) देवमोगरा येथे जात होते. तर काशिनाथ चौधरी हे आपल्या दुचाकीने प्रकाशा गावाकडे येत होते. वैजाली चौफुलीवर जीप व दुचाकीमध्ये अपघात झाला. धडक एवढी जबर होती की चौधरी हे दुचाकीसह लांब फरफटत गेले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. जीप रस्त्याच्या खाली खोल खड्डयात उलटली. जीपमधील प्रवाशांना स्थानिकांनी मदत करून काढले. नंदुरबार कडून शहादाकडे जाणारे श्वानपथक हे वाहन थांबून पोलिसांच्या गाडीमध्ये प्रकाशाचे पोलीस गौतम बोराळे, संदीप खंदारे, दिलीप गावित, पंकज जिरेमाळी, पीएसआय डोंगरे , तर गावातील सुरेश चौधरी यांनी जखमींना उचलून तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नेले. त्यांना शहादा व नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहादा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
जीप-दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:05 IST