सोमवारी रात्री राकसवाडे येथील महेंद्र पमन राजपूत हा भरतसिंग तुंबा राजपूत (५५) यांच्यासह हे एमएच १८ पी ५६९९ या दुचाकीने नंदुरबारकडे जात होता. राकसवाडे फाट्यावर त्यांच्या दुचाकीमागून ट्रॅक्टर येत होते. दरम्यान तळोद्याकडून नंदुरबारकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एमएच ३९ एबी ९००४ या चारचाकी वाहनाने प्रथम ट्रॅक्टर व त्यानंतर दुचाकीला धडक दिली. धडकेत दुचाकीस्वार महेंद्र राजपूत हा दूरवर फेकला जाऊन जखमी झाला तर मागे बसलेले भरतसिंग राजपूत हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. धडकेत अमोल सुभाष राजपूत हा ट्रॅक्टरचालक ही जखमी झाला. याबाबत अमोल राजपूत याने उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक जितेंद्र पंडित कापसे रा. जोहरी गल्ली तळोदा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक यादव भदाणे करत आहेत.
शेवाळी ते नेत्रंग महामार्गावरील राकसवाडे चाैफुली ही दिवसेंदिवस धोकेदायक होत आहे. यातून अपघातांची मालिका सुरु आहे. याठिकाणी उपाययोजना नसल्याने हे अपघात होत असल्याचे या भागातील रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे.