नंदुरबार : २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीच्या कटू आठवणी आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. आता पुन्हा १००, दहा व पाचच्या नोटा बंद होण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून कुणी या नोटा घेण्यास तयार नाही. बँकांना अद्याप याबाबत काहीही सूचना मिळालेल्या नाहीत. या नोटा टप्प्याटप्प्याने होतील बंद होतील, तसा आदेशही अद्याप निघालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नोटा जमा करण्याची घाई करू नये, असे आवाहन बॅंकांनी केले आहे.
पाच ते १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद होण्याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत शासनाने अद्याप आदेश काढलेले नाहीत. असे असतानाही या विषयाच्या चर्चेमुळे मात्र नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्येही घबराट पसरली आहे. जुन्या नोटा जमा करण्यासाठी बँकामध्ये काहीजण जात आहेत. नियमित भरणा करण्यामध्ये या नोटा स्वीकारल्या जात आहेत. गेल्या काही दिवसात जुन्या नोटा येण्याचे प्रमाण वाढल्याचेही बँकांनी स्पष्ट केले.
बँकामध्ये वाढला जुन्या नोटांचा भरणा...
बॅँकामध्ये व्यापारी तसेच इतरा ग्राहकांकडून जुन्या नोटांचा भरणा वाढला आहे. बँकादेखील त्या बिनदिक्कत स्वीकारत आहेत. गेल्या काही दिवसात त्याचे प्रमाण वाढले आहे. नोटाबंदीचा मागील अनुभव वाईट असल्यामुळे नागरिक आता कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याकडील जास्तीत जास्त जुन्या नोटा खपविण्याच्या मार्गावर आहे. बँका जुन्या नोटा स्वीकारत असल्या तरी ग्राहक कॅश काऊंटरवरून जुन्या नोटा घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
नव्या नोटांची कॅश काऊंटरवर मागणी
राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांमधील कॅश काऊंटरवर पाच रुपये ते १०० रुपयांच्या नव्या नोटांचीच मागणी वाढली आहे. काही वेळा कॅशिअरशीदेखील वादविवाद होत आहेत. त्यामुळे काही बँकांनी जुन्या नोटा बंद झालेल्या नाहीत त्यामुळे त्या स्वीकाराव्या अशा सूचनाच दर्शनी भागावर लावल्या असल्याचे दिसून येत आहे.
अद्याप आदेश नाहीत...
पाच, दहा, २०, ५० व १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद होतील याबाबत कुठलाही आदेश प्राप्त नाही. त्यामुळे या नोटांचा दैनंदिन व्यवहार सुरू असल्याची माहिती एका बँकेच्या अधिकाऱ्याने दिली.
कोट....
ग्राहकांकडून जुन्या नोटा दिल्या जातात, परंतु स्वीकारल्या जात नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. निर्णय झालाच तर तो टप्प्याटप्प्याने होईल त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच नोटा स्वीकाराव्या अशी अपेक्षा आहे.
-चंपालाल राठोड, व्यापारी.
शासनाने किंवा आरबीआयने अद्याप जुन्या नोटांबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. असे असतानाही ग्राहकांसह काही व्यापारीदेखील जुन्या नोटा स्वीकारत नसल्याची स्थिती आहे. शासनाने निर्णय घेण्यापूर्वी नव्या नोटा त्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
-श्यामजीभाई पटेल, व्यापारी.