नंदुरबार : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात आठ हजारांपेक्षा अधिक असलेल्या कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या प्रचंड घसरली असून हा आकडा आता केवळ ७०० वर आला आहे. जिल्ह्यासाठी ही समाधानाची बाब असून आता ७०० वरून शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना गतिमान झाल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड वेदनादायी ठरली. मार्च, एप्रिल व मेचा पहिला आठवडा खरोखरच प्रशासनासाठी आव्हानात्मक होता. या काळात रुग्णांची रोजची संख्या जवळपास ५०० ते १ हजार ३०० पर्यंत होती. आधीच सुविधांची वानवा आणि त्यातच रुग्ण संख्या वाढल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली हाेती; परंतु प्रशासनाने एकीकडे रुग्णांवर उपचार आणि दुसरीकडे सोयी सुविधांचा विस्तार या दोन्ही बाजूने काम केल्याने बेड मिळत नाही, ही स्थिती सुधारली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ५०० पर्यंत पोहोचली होती; परंतु हे प्रमाण आता हळूहळू कमी झाले असून सद्य:स्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ७०० च्या घरात आहे. रोज आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांची संख्याही दोन आकडी झाल्याने नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ९२ हजार ६२६ जणांची कोरोना चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. यातील १ लाख ५३ हजार ५३० जणांचे स्वॅब हे निगेटिव्ह, तर ३७ हजार १९७ जणांचे स्वॅब हे पाॅझिटिव्ह आले होते. यातील ३५ हजार ५४४ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे. लसीकरणाचा टक्का वाढत असल्याने रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनावर लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यानुसार योग्य ती कारवाई होत आहे. अडीच लाख नागरिकांना लस दिली गेली आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.
- डाॅ. एन. डी. बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.
रिकव्हरी रेट @ ९५ टक्के - जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९५.६१ टक्के झाला आहे. यातून उपचार घेणाऱ्या इतर बाधितांमध्येही चैतन्य निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत मृत्यूंची संख्याही कमी झाली असल्याने डेथरेट १.९९ वर थांबला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असतानाच त्यांच्या म्युकरमायकोसिसबद्दलच्या तक्रारींचे निरसन करून गरज भासल्यास तातडीने उपचार केले जात असल्याने रुग्णांमधील भीती कमी झाली आहे. डेथरेट आणि रिकव्हरीरेट वाढत असताना पाॅझिटिव्हिटी रेट हा १९.३१ आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातून केवळ ४४९ रुग्ण आढळून आले होते. नवीन आठवड्यातही ही संख्या नियंत्रणात आहे.