लोकमत न्यूज नेटवर्कवडाळी : शहादा तालुक्यातील वडाळी ते काकर्दा रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी सहा आसनी रिक्षा मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उलटून झालेल्या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात एका आठ वर्षीय बालकाची प्रकृती चिंताजनक आहे.वडाळी ते काकर्दा रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी रिक्षा (क्रमांक एम.एच. 39 डी.0075) मजुरांना घेऊन जात असताना एक्सिलेटर वायर तुटल्याने चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटून ती उलटली. रिक्षामध्ये एकूण 17 मजूर प्रवास करीत होते. यातील नऊ जण गंभीर जखमी असून काही जण किरकोळ जखमी आहेत. मुकेश कायसिंग भिल या आठ वर्षीय बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने नंदुरबार
येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींमध्ये शिवा भिल (10), प्रकाश भिल (34), विलास भिल (16), प्रदीप भिल (16), मनराज भिल (20), हिराबाई भिल (30), सुखदेव भिल (18), दिलीप मालचे (23), रेखा भिल (19), धनराज भिल (16), कालू भिल (28), किरण बाई (18) यांचा समावेश आहे. यातील काही जण किरकोळ जखमी असून या जखमींना प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले. अपघात झाल्याचे समजताच तुषार गोसावी, जयेश माळी, गणेश गोसावी, राकेश माळी, विशाल गोसावी, दिनेश बैसाणे, धनराज सोनवणे, सुनील माळी, दिनेश पाटील आदींनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी सहकार्य केले. रिक्षा चालक अजय डोंगर याच्याविरुद्ध मोटार अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, संजय बागले, गोविंद जाधव हे करीत आहेत.