तालुक्यातील वळफळ्या येथे पडिक क्षेत्रात शेळ्यांना चरण्यासाठी सोडले होते. काही कालवधीनंतर त्या शेळ्यांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. अवघ्या काही वेळातच काही शेळ्यांचा मृत्यू झाल्यामुळे शेळी मालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात धाव घेतली. तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन शेळ्यांवर औषधोपचार करून लसीकरण करण्यात आले. तरीही त्यात काही शेळ्या मरण पावल्या तर काही शेळ्यांचा लसीकरणामुळे जीव वाचला. आतापर्यंत एकूण नऊ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. पाच शेतकऱ्यांच्या १५ शेळ्यांवर पशुवैद्यकीय डॉक्टरांमार्फत उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या काही शेळ्या दगावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. पिंटू अमरसिंग वळवी यांच्या दोन शेळ्या, नुऱ्या सेल्या वळवी यांच्या तीन, शेळ्या, खुमानसिंग सेल्या वळवी यांची एक शेळी, तेरसिंग गण्या वळवी यांच्या दोन तर मुकेश अमरसिंग वळवी यांच्या एका शेळीचा मृत्यू झाला आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे ७० हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती महसूल, वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाला देण्यात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रोषमाळ बुद्रूकचे मंडळ अधिकारी आर.एस. पाडवी, तलाठी डी.एच. गांगुर्डे, कोतवाल अनिता मक्राणे यांनी पशुमालक व ग्रामस्थांसमोर मृत्यू झालेल्या शेळ्यांचा पंचनामा केला. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मृत झालेल्या शेळ्यांच्या मांसाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. नंदुरबारचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रताप पावरा यांनी मृत शेळ्यांचे विच्छेदन केले. त्यांच्या अहवालानुसार विषारी वनस्पतीची पाने खाल्ल्याने या शेळ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या वेळी तळोद्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नवले, धडगावचे पशुधन पर्यवेक्षक डॉ.राजपाल पावरा, डॉ.होंडे, डॉ.नरेंद्र चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित विभागाकडून मृत झालेल्या शेळी मालकांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
मोकाट कुत्रे व जंगल प्राण्यांचा शेळ्यांवर हल्ला
धडगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मोकाट कुत्रे व जंगली प्राण्यांचा मुक्त वावर वाढला असून तालुक्यातील खडकला बुद्रूक व खडकला खुर्द गावातील १५ ते २० शेळ्यांचा फडशा पाडला आहे. मोकाट कुत्रे व कोल्ह्यांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून अशा घटना तालुक्यातील ग्रामीण भागात रोज घडत आहेत. या घटनांमुळे शेळीपालन करणारे धास्तावले असून मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.
काही दिवसांपूर्वीच माझी एक शेळी चरायला गेली असता चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करून ठार केले. असाच प्रकार आमच्या शेजारील शेतकऱ्याच्या तीन ते चार शेळ्यांचे नुकसान मोकाट कुत्रे व जंगली प्राण्यांनी केले आहे. या भीतीतूनच मी माझ्या शेळ्या विकल्या मात्र. गावात शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मनात मात्र धडकी कायम आहे.
-वाहऱ्या उग्रावण्या पावरा, शेतकरी, खडकला बुद्रूक, ता.धडगाव