नंदुरबार : जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत तीव्र स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे. दरम्यान २१ ऑगस्टनंतरही १५ दिवस जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळत राहणार असल्याने शेतीपिकांची चिंता मिटणार आहे.
जिल्ह्यात १७ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे. जून ते ऑगस्ट मध्य या काळात कोरडे दिवसच अधिक असल्याने शेतीपिके हातची गेली होती. परंतू दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जुलै महिन्यात पेरणी केलेल्या सर्व पिकांना जीवदान मिळाले आहे. आगामी तीन दिवसात आणखी पाऊस कोसळणार असल्याने कापूस, सोयाबीन यासह धान्य, कडधान्य आणि बागायती पिकांनाही पूर्णपणे लाभ होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
२१ ऑगस्टपर्यंत हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी त्यापुढे १५ दिवसही पाऊस तुरळक स्वरुपात हजेरी लावणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्राचे कृषी हवामान तज्ञ सचिन फड यांनी वर्तवला आहे.
१७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ यादरम्यान नंदुरबार तालुक्यात ६३ मिलीमीटर, शहादा ४४, अक्कलकुवा ४८, नवापूर ३०, धडगाव ३२ तर तळोदा तालुक्यात ४५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. तर १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ ते १९ रोजी सकाळी साडेआठ या वेळेत नंदुरबार तालुक्यात १५, शहादा १५, अक्कलकुवा ६, नवापूर २५ तर धडगाव आणि तळोदा तालुक्यात प्रत्येकी ५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.