लोकमत न्यूज नेटवर्कवडाळी : उज्वल भविष्याचे स्वप्न अपूर्ण सोडून सोरायसिस आजारा पुढे नेहा गोसावी प्राणाची बाजी हारली. नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात तीने वडाळी येथील विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला होता. तिच्या अकाली निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.वडाळी येथील नेहा दीपक गोसावी ही नुकत्याच झालेल्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत वडाळी येथील जी. एस. विद्यामंदिर शाळेत ८२ टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. आपल्या उराशी इंजिनिअर होण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करत होती. आई, बाबांना ती नेहमीच सांगत होती. या गरिबीच्या परिस्थितीतून मी तुम्हाला बाहेर काढेल असे सांगून ती कुटूंबाला हिंमत देत होती. मात्र नियतीने तिचे स्वप्न पुर्ण होऊ दिले नाही. तिला सोरायसीस नावाच्या आजाराने ग्रासल होते. गेल्या सहा महिन्यापासून सतत सुरू असलेले लॉकडाऊनमुळे तिला वेळोवेळी व आवश्यक उपचार मिळत नव्हते. याच काळात या आजाराने डोके वर काढून तिला कुटूंबापासून हिरावून नेले. वडिलांची परिस्थिती हालाखीची असल्या कारणे त्यांनी आपल्या परीने उपचारासाठी खूप प्रयत्न केले त्यांना पण अपयश आले. अखेर ३० आॅगस्ट रोजी तिची प्राणज्योत मावळली.जी. एस. विद्यामंदिर मुख्याध्यापक सी. पी. पाटील, वर्ग शिक्षक ए. एफ. सामुद्रे यांनी ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर तिचा घरी जाऊन यथोचित सत्कार केला होता. अत्यंत हुशार आणि मनमिळावू विद्यार्थिनी आपल्याला सोडून गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तिच्या अंत्ययात्रेत शिक्षक-विद्यार्थी मित्र-मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिच्या पश्चात एक लहान भाऊ, आई, वडील, आजी, आजोबा, काका असा परिवार आहे.
दहावीत पहिल्या आलेल्या नेहाचे स्वप्न अपुर्णच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:44 IST