शहादा नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शेख इकबाल शेख सलीम व अपक्ष नगरसेवक रियाज अहमद अब्दुल लतीफ कुरेशी हे दोघे सोमवारी सकाळी १० वाजेपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. याबाबत दोघा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह नाशिक विभागीय आयुक्त, नगराध्यक्ष, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन ते अडीच वर्षांपासून आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे तोंडी व लेखी पत्राद्वारे शहादा नगरपालिकेतील मनमानी कारभार व भष्ट्राचाराबाबत वारंवार तक्रार करत होतो. नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन विषयांचा ठराव पास करून घेतले आहेत. परंतु, या ठरावांव्यतिरिक्त शहारातील काही कामांच्या विषयाचा ठराव नसतानाही मुख्याधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने ठेकेदारांकडून परस्पर कामे केली. त्या कामांचे बिलदेखील ठेकेदारास अदा करण्यात आले आहे. त्यामध्ये शहराच्या मध्यभागात नगरपालिकेमार्फत लोकमान्य टिळक टॉऊन हॉल बांधण्यात आले. परंतु, त्या हॉलचे कम्पाऊंड व त्याला लागून इतर कामांची मंजुरी न घेता एकूण सुमारे ६५ लाख रुपये परस्पर ठेकेदारास अदा केले गेले. हे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे असतानाही बिल देण्यात आले. अशीच काहीशी अवस्था मंगळबाजार शॉपिंगची आहे. येथे पालिकेने नियम धाब्यावर ठेवत या शॉपिंगला पार्किंगच दिलेली नाही. मुख्याधिकारी यांच्याकडे ठेकेदारांच्या निकृष्ट कामांच्या अनेक तक्रारी करूनही मुख्याधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालतात. त्यांना साधी नोटीसही बजावली जात नाही. याआधीही नगरसेविका विद्याबाई जितेंद्र जमदाडे यांनी मुख्याधिकाऱ्यांविरोधात नगरविकास मंत्री, नगरपरिषद संचालनालय मुंबई, आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी नंदुरबार यांनाही मनमानी कारभार व भ्रष्टाचाराबाबत तक्रार केली आहे. त्याबाबत नगरविकास प्रशासन मुंबई व जिल्हा प्रशासन नंदुरबार यांच्याकडून तक्रारीच्या अनुषंगाने खुलासा मुख्याधिकारी यांच्याकडून मागविला आहे. परंतु, मुख्याधिकारी यांनी वरिष्ठांच्या पत्राला अद्याप खुलासा केलेला नाही. केलेल्या तक्रारीचे निवारण होत नसल्याने नगरसेवक इकबाल शेख व रियाज कुरेशी २८ जून रोजी उपोषणाला बसणार होते. परंतु, मुख्याधिकाऱ्यांनी विनंती करीत आठ दिवसांच्या आत मागितलेल्या माहितीचा खुलासा देऊ, असे आश्वासन दिले. परंतु अद्याप संपूर्ण माहिती दिली नसल्याने दोघे नगरसेवक उपोषणाला बसले आहेत. मागितलेली संपूर्ण माहिती जोपर्यंत आम्हाला दिली जात नाही, तोपर्यंत मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुखांना नंदुरबार जिल्ह्यातून कार्यमुक्त करू नये. असे झाल्यास दोघे नगरसेवक आत्मदहन करणार असल्याचे म्हटले आहे. यासोबत टॉऊन हॉलचे निकृष्ट काम व ठराव नसताना एकूण ६५ लाख रुपयांचे कम्पाऊंड काम व मंगळ बाजाराला नसलेली पार्किंग याची चौकशी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्यांचे लोकार्पण करू नये. अन्यथा त्याच दिवशी त्या वास्तूसमोर दोघे नगरसेवक आत्मदहन करू. भ्रष्टाचारी मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी व अपक्ष नगरसेवकांच्या उपोषणाने पालिका वर्तुळात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST