शहरातील एकाच परिवारातील चार ते पाच सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघत असूनही अशा धोकादायक परिस्थितीत शहरात बाजार भरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होत आहे. नवापूर नगरपालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाकडून आठवडे बाजार बंद करण्यासंदर्भात ठोस उपाययोजना केलेल्या दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासकीय अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहे.
या भाजीपाला मार्केटमध्ये ग्राहक व व्यापाऱ्यांकडून तोंडावर मास्क न लावता लिलाव प्रकिया आणि व्यवहार करण्यात येत आहेत. शहरातील शनिवार बाजारात गर्दी झाल्याने नगरपालिका कार्यालयाजवळ प्रचंड गर्दी दिसून येत होती. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शहरातील लाइट बाजार, लिमडावाडी, बसस्थानक परिसरात दररोज गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे नवापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असून, प्रशासनाने खबरदारी घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
नवापूर तालुक्यात आतापर्यंत ६ हजार २०८ जनांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यातून ८६० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, त्यातून ७८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५३ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी तोंडावर मास्क लावणे गरजेचे असून, ऐकामेकांमध्ये सामाजिक अंतर व हात स्वच्छ धुणे या या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, नवापूर तालुक्यात कोरोना महामारीला नियंत्रित करण्यासाठी नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.