भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे पर्यटनासोबतच आदिवासी संस्कृतीचा अभ्यास व्हावा, म्हणून वनविभागाने पुढाकार घेतला आह़े यासाठी वनविभागाने थेट पारंपरिक आदिवासी वस्तूंचे संग्रहालय आणि निसर्ग माहिती केंद्र सुरु केले असून येथून पर्यटकांना विस्तृत माहिती देण्याचा वेगळा प्रयोग राबवण्यास सुरुवात केली आह़े तोरणमाळ येथील वनविभागाच्या विश्रामगृहात साकारल्या गेलेल्या या वस्तू संग्रहालयात तब्बल 50 पेक्षा अधिक पुरातन वस्तूंचा ठेवा आणि नैसर्गिक वनौषधींची माहिती संकलित करण्यात आली आह़े ही माहिती दिवसेंदिवस वृद्धींगत व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येऊन नवापुर, तळोदा, अक्कलकुवा आणि नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातील आदिवासी बांधवांसोबत संपर्क करुन माहिती मागवली जात आह़े यात काहींनी सहकार्य करत पारंपरिक जीवनासोबत शेतीशी निगडीत असलेले साहित्यही देऊ केले आह़े वनविभागाकडून आदिवासी साहित्यिक आणि विचारवंतांसोबतच स्थानिक रहिवाशांच्या मदतीने या उपक्रमाला वेग देण्यात येत आह़े वनविभाग आणि तोरणमाळ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पात संग्राहालयाला भेट देणा:या पर्यटकांसाठी शुल्क ठेवण्यात येणार आह़े जमा झालेला हा पैसा तोरणमाळ आणि परिसरातील आठ गावांच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार असून त्यादृष्टीने वनविभाग नियोजन करत असल्याची माहिती तोरणमाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन खुणे यांनी दिली आह़े पारंपरिक संग्रहालयाच्या या उपक्रमात माहितीचे जाळे आणखी प्रगल्भ व्हावे यासाठी वनविभागाच्या संकेतस्थळावरही याची माहिती प्रकाशित करुन पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत़ प्रथमच निर्माण केलेल्या या संग्रहालयाच्या विकासासाठी वनविभाग निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आह़े
साहित्याची जुळवाजुळव तोरणमाळ फेडरेशनमध्ये समाविष्ट असलेल्या राणीपूर, कोटबांधणी, तोरणमाळ, बुरुमपाडा, खडकी, लेंगापाणी, साबलापाणी या गावांमधील ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्णत्त्व येणा:या या प्रकल्पात आणखी वस्तूंचा संग्रह व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ हे जुन्या वस्तूंच्या संकलनासाठी वेळावेळी भेटी देऊन माहिती घेत आहेत़ संग्रहालयात वस्तू ठेवल्यानंतर संपूर्ण माहिती त्याठिकाणी देण्याचा प्रयोगही येथे होत असल्याने आदिम जीवनाचा लेखाजोखा प्रथमच संपूर्णपणे समोर येणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आह़े
प्रोजक्टरद्वारे माहितीपट तोरणमाळात सध्या पर्यटकांची गर्दी वाढत आह़े या पर्यटकांना केवळ वस्तूच नव्हे तर व्हीडिओद्वारे आदिवासी जीवनाची महती समजावी म्हणून वनविभागाने येथे प्रोजेक्टर लावला आह़े याद्वारे प्रत्येकी 30 पर्यटकांना प्रवेश देऊन अर्धा ते पाऊण तासाची चित्रफित दाखवण्यात येणार आह़े यासाठी हॉल तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े हॉलसोबत जोडलेल्या तीन मोठय़ा खोल्यांमध्ये वस्तू संग्राहालय आणि सातपुडय़ात उगवणा:या वनौषधींची माहिती देण्यात येणार असल्याचेही वनविभागाने म्हटले आह़े या प्रयोगाला येत्या काळात यश आल्यास मोठय़ा स्तरावर तोरणमाळ येथेच हा उपक्रम वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आह़े तूर्तास याठिकाणी पुरातन धान्य दळण्याचे जातं, पारंपरिक शस्त्र, महिलांचे दागिने, बांबूची शेतीपयोगी साधने, जुन्या काळातील झाडू, शेतीपयोगी नांगर आदी 50 वस्तू ठेवून सांस्कृतिक संवर्धन केले जात आह़े यातून स्थानिकांना रोजगार मिळाला आह़े