लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण रखडल्याने रस्त्याची प्रचंड दैना झाली आहे. धावती वाहने रस्त्यात फसुन जाणे व रस्त्याच्या कडेला पलटी होणे असे प्रकार वाढीस येत आहेत. यातून रहदारीचा खोळंबा, अपघात, वित्त व जीवीतहानी होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.आर्थिक संकटात सापडलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व चौपदरीकरण करणारी कंपनी यामुळे कोंडाईबारी ते बेडकी या 55 किलोमिटर अंतराची अक्षरश: चाळण झाली आहे. दरदिवशी तीन हजाराहून अधिक वाहनांच्या वर्दळीमुळे महामार्गाचे ठराविक अंतरात झालेले काम कुचकामी ठरले आहे. जेथे काम बाकी होते असा रस्त्याचा भाग तर जीवघेणा ठरु लागला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायंगण शिवारातील ब्रिटीशकालीन पूल कोसळल्याने महामार्ग बंद पडला. संवेदनशिल घटना घडल्यानंतर त्याकडे गांभिर्याने पाहणे आवश्यक असतांनाही महामार्ग प्राधिकरण झोपेचे सोंग घेऊन राहिले. पाईपचा पुरवठा केल्याखेरीज ते ही जास्त काही करु शकले नाही. दररोज सुमारे दोन कोटीचे नुकसान होत असल्याचे पाहून महामार्गावर व्यवसाय करणारे सर्वस्तरातील व्यापा:यांनी एकत्र येवून मातीचा भराव करीत 12 दिवसानंतर महामार्ग पूर्ववत सुरु करण्यात यश मिळविले. रायंगण येथील मोठा पुल व शहरालगतचा वाकीपाडा येथील पुल कधी कोसळेल हे सांगणे कठीण झाले असतांना आता महामार्गाची नव्याने केलेली उभारणी जीवावर बेतत आह़े एकाच दिवसात पानबारा जवळ दोन वेगवेगळी वाहने रस्यावर चिखलात रुतून गेली तर विसरवाडी जवळ एक ट्रक पलटी झाला. एकाच दिवसात तीन अपघात झाल्याने वाहन मालकांचे आर्थिक नुकसान झाले आह़े यातून वाहतुकीचा खोळंबाही झाला़ यातून अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.या घटना नित्याच्या झाल्या असुन लहान चारचाकी वाहने फसुन जातील इतके मोठ्या आकाराचे खड्डे महामार्गावर झाले आहेत. रस्त्यावरील डांबराचा थर निघुन गेला आहे व मातीचा भाग वर आल्याने मोठी वाहने रुतुन जातील अश्या अवस्थेत चिखल झाला आहे. याचा अंदाज येत नसल्याने अश्या घटना वाढीस येत आहे. महामार्गाचा कोणी वालीच नसल्याने व चौपदरीकरण रखडल्याने या घटना घडत आहेत़ या घटनांना कसा व केव्हा पायबंद घातला जाईल, असा जटील प्रश्न चर्चिला जात आह़े
वाहने फसत असल्याने राष्ट्रीय महामार्ग थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:18 IST