नंदुरबार : काँग्रेस-आघाडी व भाजप युतीचे उमेदवार सोमवार, ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत दोन अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत सर्वच प्रमुख उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज घेतले आहेत. त्यातील दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅड.के.सी.पाडवी व भाजप युतीचे उमेदवार डॉ.हिना गावीत गावीत हे दोन्ही उमेदवार सोमवार, ८ रोजी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसने आधी शक्तीप्रदर्शन करीत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु आचारसंहितेचे कारण नमुद करीत शक्ती प्रदर्शनाऐवजी मुख्य पदाधिकाऱ्यांसह जावून अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. तर भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सोशल मिडियावरील मेसेजवरून फिरत आहे. मात्र, भाजपकडून अधिकृत काहीही जाहीर झालेले नाही.याशिवाय दोन्ही पक्षातून काही नाराज देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. याकडे लक्ष लागून आहे.दरम्यान, ९ एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. तर १० एप्रिल रोजी दाखल अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
नंदुरबारातील दोन्ही प्रमुख उमेदवार ८ रोजी अर्ज दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 11:44 IST