नंदुरबार : शहरातून, तसेच जिल्ह्यातून धावणारी वाहने त्यांच्या आगळ्यावेगळ्या नंबर प्लेटसाठी लक्षवेधी ठरतात. आरटीओकडून दिल्या जाणाऱ्या या फॅन्सी नंबर प्लेटसाठी हाैशींकडून पैसे मोजले जात असून साधारण १५ हजार ते तीन लाख यादरम्यान पसंतीचे वाहन क्रमांक देण्याची पद्धत प्रादेशिक परिवहन विभाग दरवर्षी अवलंबत आहे. यातून आरटीओ कार्यालयांना मोठी कमाईही होत आहे.
नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शासनाच्या आदेशाने काही कालावधीनंतर पसंती क्रमांकाची यादी प्रसिद्ध करून अर्ज करण्याचे आवाहन केले जाते. यातून एखाद्या खास क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास मग त्या क्रमांकासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासमोर लिलावही केला जातो. नंदुरबार जिल्ह्यातून प्रामुख्याने ७७७७, ७७७, ९९९, ००९, ११११ यासह इतर काही पसंती क्रमांकाची मागणी केली जाते. परंतुल, सर्वाधिक पसंती ही ९ अंकाचा समावेश असलेल्या क्रमांकाला आहे. काहींकडून मुलांच्या किंवा स्वत:च्या जन्मतारखांनुसार क्रमांकांची मागणी केली जाते. यासाठीही नागरिक पैसे मोजत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
अधिकारी रजेवर...
दरम्यान, फॅन्सी नंबर प्लेटबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांना संपर्क केला असता, ते वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली.
पसंती क्रमांकासाठी नियमित अर्ज मागवले जाऊन ते क्रमांक वितरित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
जिल्ह्यातील उद्योजक, राजकारणी, प्रगतिशील शेतकरी यांच्याकडूनही विशिष्ट पसंती क्रमांकाची मागणी केली जाते.
काही हाैशींकडूनही या क्रमांकांची मागणी केली जाते. त्यांचे अर्ज मागवले जाऊन पुढील कारवाई होते.
एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज असल्यावरच लिलाव प्रक्रिया पूर्ण होते.
२०२० पासून सुरू झालेली कोरोना महामारी अद्यापही सुरू आहे. या महामारीच्या पार्श्वभूमीवर हाेणारे लाॅकडाऊन वाहन खरेदी व विक्रीवर परिणामकारक ठरले होते; परंतु यातही ज्यांनी वाहनांची खरेदी केली त्यातील निम्म्याजणांनी फॅन्सी नंबरप्लेट घेतली आहे. यातून आरटीओ कार्यालयात १३ लाखांचा महसूल २०२०-२१ या आर्थिक वर्षात गोळा झाला आहे.
शासनाकडून दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांसाठी १५ हजारांपासून तीन लाखांपर्यंतची रक्कम पसंतीच्या क्रमांकासाठी आकारली जाते. काही क्रमांकसाठी पाच हजार, सात हजार, तसेच १० हजार रुपयांचा भरणा केल्यावरही पसंतीचा क्रमांक दिला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.