पालकमंत्री म्हणाले, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत असतात. अशावेळी त्यांना चांगल्या सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोना काळातही पोलीस दलाने उत्तम कामगिरी केली. पोलिसांची कामगिरी अधिक चांगली व्हावी यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येतील. पोलिसांनी कर्तव्य बजावताना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. परस्पर सहकार्याच्या भावनेतून जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामांमुळे जिल्ह्याची वेगाने प्रगती होत आहे असेही ते म्हणाले.
खासदार गावीत म्हणाल्या, रेल्वे लाईनचा परिसर असल्याने या भागासाठी पोलीस ठाण्याची इमारत महत्त्वाची ठरेल. शहराचा विस्तार लक्षात घेता पोलिसांसाठी सुसज्ज इमारतीची गरज होती. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पंडित म्हणाले जिल्ह्यातील १२ पोलीस ठाणे इमारतींपैकी सर्वात सुसज्ज इमारत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यासाठी उभारण्यात आली आहे. ९० लाख रुपये खर्चाच्या या इमारतीत अन्य सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३३ लाख रुपये मिळाले आहेत. पोलिसांना मिळालेल्या नवीन वाहनामुळे दुर्गम भागातील पोलीस अधिकाऱ्यांना अधिक चांगले काम करता येईल.
प्रास्ताविकात उपअधीक्षक हिरे यांनी इमारतीविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.