लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाने नंदुरबार तालुक्यात ५०० चा आकडा पार केला आहे तर जिल्ह्यात ८०० पार झाला आहे. मृतांची संख्या देखील पन्नाशीच्या घरात पोहचली आहे. जिल्ह्यात एकुण ४५ जणांचे मृत्यू झाले असून त्यात फक्त नंदुरबार तालुक्यातीलच तब्बल २६ जणांचा समावेश आहे. नंदुरबारनंतर शहादा तालुका या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे सुदैवाची बाब म्हणजे कोरोनामुक्तीचा आकडा देखील ५०० पार झाला आहे.कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अवघ्या ३५ दिवसात रुग्ण संख्या पाचपट, मृत्यूसंख्या सातपट वाढली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही सुदैवाने सहापट झाली आहे. येत्या काळात वाढीचा हा दर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. सामुहिक संसर्गापासून वाचण्यासाठी नागरिकांनीच आता स्वत:हून उपाययोजना करणे आवश्यक आहे.रुग्णसंख्या ८०० पारजिल्ह्यतील रुग्णसंख्या आता ८५२ झाली आहे. ३५ दिवसांपूर्वी अर्थात ३ जुलै रोजी रुग्णसंख्या अवघी १६३ इतकी होती. ती महिनाभरात तब्बल पाचपट वाढली आहे. वाढीचा हा वेग कमी करणे आवश्यक आहे. अर्थात स्वॅब तपासणीची संख्या पूर्वीपेक्षा दुप्पट झाल्याने रुग्ण संख्या वाढीचा वेग देखील वाढला असल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे. रुग्ण वाढीचा वेग असाच कायम राहिला तर येत्या दहा दिवसात बाधीतांची संख्या हजाराचा टप्पा पार करेल अशी भिती आहे. त्यामुळे कोरोना साखळी तोडणे आता गरजेचे आहे.नंदुरबार तालुका ५०० पारजिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नंदुरबार शहरासह तालुक्यात आढळले आहेत. आतापर्यंत तब्बल ५२७ जण कोरोनाबाधीत झाले आहेत. त्यातील २६ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. अर्थात इतर तालुक्याच्या तुलनेत नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक अर्थात २,८४० जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.नंदुरबार तालुक्यात कोरोनामुक्तीची संख्या देखील अधीक आहे. आतापर्यंत ३२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १४३ जण उपचार घेत आहेत.नंदुरबार खालोखाल शहादा तालुका आहे. शहादा तालुकाही २०० च्या घरात गेला आहे. बाधितांची संख्या सद्य स्थितीत २०४ इतकी आहे. त्यातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११६ जण बरे झाले आहेत. तालुक्यातील १,१४४ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत.तळोदा तालुक्यात रुग्णसंख्या पन्नाशी पार झाली आहे. एकुण ५७ जण आतापर्यंत बाधीत आढळले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात २९८ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यात ३९ जण बाधीत आढळले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.अक्कलकुवा तालुक्यात १९ जण बाधीत झाले. त्यापैकी १७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. धडगाव तालुक्यात एकच जण बाधीत झाला व तोही कोरोनामुक्त झाला आहे.रविवारी दिवसभरात एकुण ३३ जण बाधीत आढळले. त्यात सर्वाधिक नंदुरबार शहरातील ११ तर नवापूर शहरातील १० जणांचा समावेश आहे. याशिवाय नंदुरबार शहरातील एका बाधीताचा उपचार घेतांना मृत्यू झाला. एकुण बाधीत संख्या साडेआठशेपेक्षा अधीक गेली आहे. कोरोनाचा वाढता आकडा आता हजाराच्या घरात पोहचला आहे. दुसरीकडे कोरोनामुक्तही वेगाने होत आहे.