लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील धांद्रे खुर्द गावालगत असलेल्या नाल्याला पावसाचे पाणी आल्यामुळे दिवसभर गावातील लोकांचा संपर्क तुटला होता. लोकांना शेतीकामासाठी पाच फूट पाण्यातून नाला पार करुन जावे लागते. या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरुन ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. धांद्रे ग्रामस्थांना दरवर्षी ही समस्या सतावत असून प्रशासनाने तात्पुरता रस्ता तयार करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.आदिवासीबहुल वस्तीचे असलेले धांद्रे खुर्द गावाची लोकसंख्या सुमारे ६०० पर्यंत आहे. जयनगरपासून पाच किलोमीटर अंतरावर निंबोरालगत असलेल्या या गावाला अद्यापपर्यंत महसुली दर्जा मिळाला नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील सर्वच कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे असल्याने त्यांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित रहावे लागते. धांद्रे खुर्द गावाला चौफेरे नाल्याचा वेढा आहे. पावसाळ्यात या नाल्याला पाणी येत असल्याने आजूबाजू सर्वत्र पाणी व मध्येच गाव अशी एखाद्या बेटासारखी परिस्थिती निर्माण होते. वाहन तर सोडा बैलगाडी काढणेही या नाल्यातून मुश्कील होते. त्यामुळे नाल्यात असलेल्या चार ते पाच फूट पाण्यातून मार्गक्रमण करीत शेतात मजुरीसाठी जावे लागते. पाण्यातूनच प्रवास करावा लागत असल्याने विंचू, सर्प यांचाही धोका असतो. गावाच्या चौफेर असलेल्या नाल्यात संपूर्ण पावसाळ्यात पाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी निर्माण होऊन ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्नही उभा ठाकतो.याबाबत स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते ईश्वर माळी यांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे नाल्याला पाणी आल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. धांद्रे खुर्द ग्रामस्थांना पावसाळ्यात दरवर्षी ही समस्या सतावत असल्याने प्रशासनाने किमान ये-जा करण्यासाठी नाल्यावर फरशी पूल किंवा रस्ता बनवून पावसाळ्यात होणारे हाल थांबविण्याची मागणी त्रस्त ग्रामस्थांकडून होत आहे.
धांद्रे गावाला नाल्यातील पाण्याचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:54 IST