सर्वात आधी महिलेची ओळख पटणे महत्वाचे आहे. त्यासाठी जिल्ह्यासह धुळे जिल्हा आणि लगतच्या गुजरात व मध्यप्रदेशातील जवळच्या पोलीस ठाण्यांना कळवून आपल्या हद्दीत कुणी २२ ते ३० वर्षीय महिला बेपत्ता आहे किंवा कसे याची माहिती घेण्यात येत आहे. परंतु शुक्रवारी सायंकाळपर्यंत सर्वच पोलीस ठाण्यांकडून कुणीही बेपत्ता नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता पोलिसांकडून तपासाला वेगळी दिशा देण्याचे ठरविण्यात आले आहे. शहर पोलिसांप्रमाणेच एलसीबीने समांतर तपासाला गती दिली आहे. यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रेल्वेरुळालगतच मृतदेह आढळून आला असल्याने त्यादृष्टीनेही तपासाला दिशा देण्यात येत आहे.
महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे चेहरा ओळखणे किंवा शरीरावरील गोंदणसह काही निशाणी सापडत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे शरीरावरील पंजाबी ड्रेसच्या आधारेच काही धागेदोरे सापडतात का यादृष्टीने तपास केला जाणार आहे. श्वान पथकाने देखील अपेक्षित माग दाखविलेला नाही. यामुळे काहीही धागेदोरे नसलेल्या या घटनेचा तपास कसा केला जातो, घटनेचा उलगडा कसा होतो याकडे आता लक्ष लागून आहे.