तळोदा : रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या अतिक्रमण धारकांना तातडीने अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीसा बजविण्यात आल्या आहेत. 75 व्यावसायिकांना या नोटीसा बजविण्यात आल्या आहेत. या नोटीसात आठ दिवसांचा अल्टीमेटम् देण्यात आला आहे. दरम्यान अतिक्रमण काढण्यासाठी पालिका सोमवारपासून मोहिम राबविणार असल्याचे पालिकेच्या बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले.येथील पालिकेने आपल्या हद्दीतील रस्त्यांचे रूंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी डिवाईडर बसवून फुटपाथ विकसीत करण्यात येणार आहे. साहजिकच शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तथापि या दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा व्यावसायिकांनी हातगाडय़ा, टप:या, शेड उभारून कच्चे वा पक्के अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी अडथळा ठरत असल्यामुळे पालिकेच्या प्रशासनाने अशा अतिक्रमण धारकांना नोटीसा बजाविल्या असून, जवळपास 75 अतिक्रमणधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. साधारण एक आठवडय़ात आपले अतिक्रमण हटविण्याचा अल्टीमेटमही देण्यात आला आहे. अन्यथा पालिका स्वत: अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करेल. शिवाय त्याबाबतचा खर्च आपणाकडून वसूल करण्यात येणार असल्याचे नोटीसीत नमूद केले आहे. पालिकेची नोटीस मिळाल्याबरोबर काही अतिक्रमण धारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुद्धा सुरू केली आहे. दरम्यान अतिक्रमण काढण्यासाठी नगर पालिका येत्या सोमवारपासून कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी पालिकेने केवळ किरकोळ व्यावसायिकांबाबत दुजाभाव न करता मुख्य रस्त्यावर पुढे आलेले अतिक्रमणाबाबतही ठोस कार्यवाही करण्याची नागरिकांची अपेक्षा आहे. कारण या मुख्य रस्त्यावर पुढे आलेले अतिक्रमण नेहमीच वाहतुकीस डोकेदुखी ठरत आहे. या वाहतुकीच्या कोंडीने अक्षरश: शहरवासीय वैतागले आहे. पालिकाने याकडे नेहमीच कानावर हात ठेवल्याचा आरोप आहे. मध्यंतरी गावातील अतिक्रमण काढण्यात आले होते. त्या वेळी काहींनी मुजोरी केल्यामुळे पालिकेने लगेच अतिक्रमण मोहीम थांबविली होती. पालिकेच्या अशा कचखाऊ भूमिकेमुळे अतिक्रमण धारकांचे फावत आहे. परिणामी शहरात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण फोफावत असल्याचे चित्र आहे.
75 अतिक्रमीतांना पालिकेच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:14 IST