नंदुरबार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतच समोर आलेला म्युकरमायकोसिस हा गंभीर आजारही आता परतीच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसमुळे आजवर एकही बळी गेलेला नसून रुग्णसंख्याही आटोक्यात आहे. या आजारामुळे केवळ दोघांनाच एक डोळा गमवावा लागला आहे.
कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिसचे रुग्ण समोर येण्याचे प्रकार सुरू झाले होते. जिल्ह्यात असे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर उपचार करता यावे यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षात एक फिजिशियन, कान, नाक, घसा तज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी म्युकरमायकोसिस झाल्यानंतर बाहेरगावी उपचार व शस्त्रक्रिया करून आलेले रुग्ण उपचार घेत असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णांना येथे इंजेक्शन दिले जात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, नुकतेच चाैघांना पुढील उपचारांसाठी बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे नवीन गंभीर रुग्ण अद्यापही समोर आलेले नाहीत.
वेळोवेळी मिळतात इंजेक्शन्स
जिल्हा रुग्णालयाच्या म्युकरमायकोसिस उपचार कक्षात दाखल रुग्णांना ॲम्फोटेरिसिन-बी नावाचे इंजेक्शन देण्यात येते. या इंजेक्शनच्या वापरामुळे रुग्ण बरा होण्याचे प्रमाण अधिक आहे. या औषधाचा साठा जिल्हा रुग्णालयात सध्यातरी आहे.
रुग्णालयातील साठा कमी झाल्यास आरोग्य संचालक यांच्याकडे पाठपुरावा करून इंजेक्शन्स मागवले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. अनेकांमध्ये कोरोनाचे उपचार सुरू असतानाच लक्षणे दिसून आले होते.
जिल्हा रुग्णालयात सध्या दाखल असलेल्या ३३ रुग्णांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील एकही रुग्ण गंभीर आजारी नसल्याचे सांगण्यात आले.
गालाच्या एका भागात किंवा दोन्ही गालात तीव्र वेदना होणे, कालांतराने दात हलण्यास सुरुवात होणे व दुखणे अशी लक्षणे प्रारंभी दिसून येतात. यानंतर नाकात चिकट स्त्राव तयार होऊन त्याचे वहन सुरू होते. या काळात कमी अधिक प्रमाणात किंवा तीव्र डोकेदुखी असल्यास दवाखान्यात तपासणी करणेही गरजेचे आहे. म्युकरमायकोसिसचे निदान करण्यासाठी वैद्यकीयतज्ज्ञ सिटी स्कॅन तसेच वेळ पडल्यास एमआरआयचाही आधार घेतात. सिटी स्कॅनमधून नाक व जबड्यात वाढणाऱ्या बुरशीची तीव्रता समोर येत असल्याचे सांगण्यात आले.
दोघांचा डोळा निकामी
जिल्हा रुग्णालयातील म्युकरमायकोसिस कक्षात दाखल केवळ दोघांचा एक डोळा बाधित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या रुग्णांच्या शस्त्रक्रिया बाहेरगावी झाल्या होत्या.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर गुजरात किंवा महाराष्ट्रातील इतर शहरात दीर्घ काळ उपचार घेतल्यांना हा त्रास जाणवत असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयातील कक्षात २४ तास सेवा दिली जात आहे.
म्यूकरमायकोसिसवर उपचार घेणारे ३३ रुग्ण आहेत. या रुग्णांना वेळोवेळी इंजेक्शन दिले जात आहेत. हे इंजेक्शन नाशिक येथून मागविले जातात. नंदुरबार येथे आरोग्य विभागाने वेळोवेळी इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. रुग्णाच्या प्रकृतीनुसार औषधे दिली जात आहेत.
-डाॅ. कल्पेश चव्हाण, तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय,
कोरोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने वेळेवर जेवण व औषधे घेणे गरजेचे आहे. प्रारंभिक लक्षणे जाणवल्यानंतर तातडीने वैद्यकीयतज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. प्राथमिक लक्षणांवर औषधोपचार वेळेवर मिळाल्यास म्युकरमायकोसिस बरा होतो.