नंदुरबार : शहरालगतच्या होळतर्फे हवेली शिवारातील वसाहतींमध्ये मोकाट गुरे सध्या नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. रात्रीच्या वेळी याच भागात रस्त्यांवर बसून राहणाऱ्या गुरांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहे. नंदुरबार शहरातून या भागात ही गुरे आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित मालकाने त्यांची पाळीव गुरे घेऊन जावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
वीजबिले वेळेवर देण्याची मागणी
तळोदा : शहरातील विविध भागांत सध्या वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. परंतु, वेळेवर वीजबिले पाठवली जात नसल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे. यातून मग थकबाकी वाढून बिले भरताना अडचणी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे लक्ष देत वीज वितरण कंपनीने तारखेच्या आत वीजबिले पाठवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात समस्या
नंदुरबार : तालुक्यातील ग्रामीण भागात सांडपाणी वितरणाची व्यवस्था नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये सांडपाणी वितरणासाठीची गटारे पूर्णपणे तुटले असल्याचे दिसून आले आहे. गटारे दुरुस्तीची कामेही योग्य त्या पद्धतीने होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायतींना निधी देऊनही कार्यवाही झालेली नसल्याची माहिती आहे.
ई-पीक पाहणी उपक्रमाला प्रतिसाद
नंदुरबार : तालुक्यातील विविध भागांत सध्या ई-पीक पाहणी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाला शेतकरीवर्गाकडून प्रतिसाद देण्यात येत आहे. हा उपक्रम राबवण्यापूर्वी गावोगावी महसूल विभागाचे कर्मचारी प्रशिक्षण घेत आहेत. या उपक्रमातही बहुतांश शेतकरी प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात आले.