नंदुरबार : घरफोडीत आता अल्पवयीन मुलांची टोळी सक्रिय झाली आहे. दोन ठिकाणच्या घरफोडीत चार अल्पवयीन मुलांचे नाव समोर आले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.
शहरातील नागाईनगर भागात मुकुंद ओंकारेश्वर भट यांच्या दुकान व घरातून चोरट्यांनी ५८ हजार रुपये किमतीच्या सिलिंडर व इतर घरगुती वस्तू चोरून नेल्या होत्या. नागाईनगरसारख्या गजबजलेल्या भागात ही चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची दिशा ठरवली. याच दरम्यान एलसीबीचे निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकास तपासाच्या सूचना दिल्या. घरफोडीतील अल्पवयीन मुले ही सिंधी कॅालनीतील असल्याचे समजल्यावर त्या दृष्टीने तपास सुरू केला. त्यानुसार एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असता त्याने त्याच्या घरातील दोन सिलिंडर व घरगुती वस्तू असा ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. त्याच्या साथीदार अल्पवयीन मुलाचा शोध सुरू आहे.
दुसरी घटना माळीवाड्यात घडली होती. राकेश पुना माळी यांच्या घरातून चोरट्यांनी ९६ हजारांचा ऐवज चोरून नेला. गजबजलेल्या भागात चोरी झाल्याने तपासाचे आव्हान होते. एलसीबीने तपासाला गती दिल्यानंतर चोरी करणारे जवळच्या चिंचपाडा भिलाटीतील अल्पवयीन मुले असल्याचे समजले. त्यानुसार तपास केला असता एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली देत मुद्देमाल आपल्या साथीदाराकडे असल्याचे सांगितले. त्याच्या साथीदाराचा शोध घेतला असता तो फरार झाल्याचे समजले.
याशिवाय मंगळ बाजारात बाजाराच्या दिवशी अनेकांचे मोबाइल लंपास झाले होते. त्यादृष्टीने तपास सुरू केला असता करण चौफुली भागात दोनजण महागडे मोबाइल घेऊन फिरत असल्याचे समजले. पथकाने त्या ठिकाणी तपास केला असता वीरेंद्र लखन सिलारे, रा.हारदा व त्याचा भोपाल येथील साथीदारास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६० हजार रुपये किमतीचे सात मोबाइल जप्त करण्यात आले.
तिन्ही गुन्ह्यात एकूण एक लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासूळ, पुष्पलता जाधव, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.