नंदुरबार : जिल्हा निर्मितीपासून रेंगाळलेली एमआयडी अद्यापही चालना घेत नसल्याची स्थिती आहे. उद्योग नसल्यामुळे जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नवापूरची एमआयडीसी रडत-रखडत सुरू आहे.नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सातत्याने विचार झाला. त्याअनुषंगाने प्रत्येक तालुका स्तरावर औद्योगिक विकास वसाहत उभारण्याचा प्रयत्न झाला. मात्र नवापूर वगळता अजूनही या औद्योगिक वसाहती सुरू झाल्या नाहीत. नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणीदेखील औद्योगिक वसाहतीची शोकांतीका आहे. दुर्देव म्हणजे येथील औद्योगिक विकास वसाहतीचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. मोठ्या थाटात औद्योगिक वसाहतीची कोनशिलाही उभारण्यात आली. पण प्रत्यक्षात तेथे औद्योगिक वसाहतीचे कामच सुरू झाले नाही. आता पुन्हा दुसऱ्यांदा औद्योगिक वसाहतीची जागा बदलण्यात आली असून, टोकरतलाव रस्त्याऐवजी भालेर रस्त्यावर ती उभारण्यात येत असली तरी तिची गती संथ आहे. नवापूर येथे सुरू असलेल्या एमआयडीसीमध्ये उद्योजकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर काही स्थलांतर होण्याच्या स्थितीत आहेत.शहादा, तळोद्याची एमआयडीसीचा प्रस्ताव अद्याप लाल फितीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला कशी आणि कोणती चालना मिळणार याबाबत शंकाच आहे.
एमआयडीसीचे भिजत घोंगडे कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:52 IST