या बैठकीस महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीचे सदस्य आमदार यामिनी जाधव, मंजुळा गावीत, डॉ.मनीषा कायंदे, सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अवर सचिव विजय कोमटवार उपस्थित होते.
समितीने विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील विविध प्रकल्प, कामे व योजनेबाबत माहिती घेतली. समिती जिल्ह्यातील विविध कार्यालयांना भेट देऊन माहिती घेतली.
जिल्हा रुग्णालयात झाडाझडती
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आमदार सरोज अहिरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दुपारी २ वाजेच्या सुमारास भेट दिली. यावेळी समितीतील सदस्य आमदारांनी विविध विभागांना भेट देत माहिती घेतली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांंना धारेवर धरले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. आर.डी. भोये यांनी यावेळी विविध विषयांची माहिती दिली. समितीने विविध वॉर्डांना भेट देत रुग्णांची विचारपूस केली. पोषण पुनर्वसन केंद्रालाही त्यांनी भेट देत माहिती घेतली. याभेटीत जिल्हा रुग्णालयात लावण्यात आलेल्या अग्निरोधक यंत्रणेची तपासणी समितीच्या अध्यक्षा आमदार अहिरे व सदस्य महिला आमदारांकडून करण्यात आली. यात प्रामुख्याने अग्निरोधक सिलिंडरवर भरणा केल्याची तारीख नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे फायर ऑडिट, ऑक्सिजन प्लांटसाठी घेतलेली काळजी यासह विविध उपाययोजना केल्याचे कागदपत्रे दाखवली होती.
अंगणवाडीसेविकेचा सत्कार
दाैऱ्याचा समारोप करण्यापूर्वी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती सदस्यांच्या हस्ते कोरोना संकटाच्या काळात चांगली कामगिरी करणाऱ्या नर्मदा किनाऱ्यावरील गावातील अंगणवाडीसेविकांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीपूर्वी समिती प्रमुख आमदार सरोज अहिरे आणि सदस्य आमदार यामिनी जाधव, मंजुळा गावीत, डॉ. मनीषा कायंदे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मैनक घोष, अवर सचिव विजय कोमटवार आदी उपस्थित होते.
कोरोना संकटाच्या काळात दुर्गम भागात पोषण आहार पोहोचविणाऱ्या पिंपळखुटा प्रकल्पांतर्गत चिमलखेडीतील रेलू वसावे, मणीबेली येथील संगीता वसावे, बामणी येथील सुमित्रा वसावे, कोराईपाडा येथील कुंदा वसावे, डनेल येथील वनिता पाडवी तसेच कुंडीबारी येथील शकिला पाडवी यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सर्व समिती सदस्यांनी या अंगणवाडीसेविकांच्या कामगिरीचे कौतुक केले.