लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या मराठी, उर्दू, गुजराथी माध्यमाच्या शिक्षकांची ९५ तर पदवीधर प्राथमिक शिक्षकांची तब्बल ९० पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक शाळांवर शिक्षकांचे समायोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक संख्या अतिरिक्त झाली आहे तर काही ठिकाणी एकाच शिक्षकावर सर्व भार टाकला जात आहे.
दरम्यान, केंद्र प्रमुख, पदोन्नती मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी यांची देखील जवळपास १०८ पदे रिक्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून सरळ सेवा भरती झालेली नसल्यामुळे पदे भरली जात नसल्याची स्थिती आहे. त्यातच जिल्हा बाहेरून बदली होऊन आलेल्या शिक्षकांना समायोजन करून काही रिक्त जागा भरल्या जात आहेत. असे असले तरी सरळ सेवा भरती होणार नाही तोपर्यंत ही ही समस्या कायमच राहणार असल्याचे स्पष्ट आहे.
जिल्ह्यात मराठी, उर्दू व गुजराती माध्यमाची ३९९४ प्राथमिक शिक्षकांच्या पदांना मंजुरी आहे. त्यापैकी सरळसेवेने ३८९९पदे भरली गेली आहेत.
एकूण ९५ पदे रिक्त आहेत. पदवीधर प्राथमिक शिक्षकांची एकूण ३१५ पदे मंजूर असून त्यातैकी २२५ पदे भरली असून ९० पदे रिक्त आहेत. आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक तसेच यापूर्वी वस्ती शाळा शिक्षकांना सामवून घेण्यात आल्याने काही प्रमाणात रिक्त संख्या कमी झाली आहे. परंतु सरळ सेवा भरती होत नाही तोपर्यंत रिक्त संख्येचा आकडा कायम राहणार आहे.
सध्या शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. काही ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा देखील बोजवारा उडाला आहे.