लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नगर पालिका निवडणुकीच्या वादातून खून झालेल्या नगरसेवकास शहीदाचा दर्जा देण्याचा पराक्रम शहादा नगरपालिका प्रशासनाने केल्याने नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतदेखील काही सदस्यांनी ‘शहीद’ या विशेषणावर आक्षेप घेत विरोध केला. दरम्यान या संदर्भात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरूण चौधरी यांनी जिल्हाधिका:यांना निवेदन देवून कार्यवाहीची मागणी केली आहे.शहादा नगर पालिकेची विशेष सभा बुधवारी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेच्या तीन पानी अजेंडय़ात तीन विषयात मयत एम.आय.एम.चे नगरसेवक सद्दाम तेली यांचा शहीद असा उल्लेख करण्यात आला होता. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत सद्दाम तेलीसह एम.आय.एम. पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले होते आणि तेव्हापासूनच गरीब नवाज कॉलनीतील दोन गटात धुसफूस सुरू होती. या वादातूनच दोन महिन्यांपूर्वी सद्दाम तेलीची निघरून हत्या झाली होती. बुधवारच्या सभेसाठीच्या विषय पत्रिकेत तब्बल तीन विषयात मयत सद्दाम तेली याचा उल्लेख ‘शहीद’ सद्दाम तेली असा करण्यात आल्याने शहरात तो एक चर्चेचा विषय झाला. 82 विषयांच्या विषय पत्रिकेत 42 वा विषय न.पा. शाळा क्रमांक 14 व 15 ला शहीद सद्दाम तेली यांचे नाव देणे बाबतचा विषय होता.सद्दाम तेली खरच शहीद झाले का? असा प्रश्न शहादेकर विचारत आहेत. आपसी वादातून खून झालेल्या एका व्यक्तीला ‘शहीद’ हे संबोधन देऊन पालिका प्रशासनाने शहिदांचा अपमान केला असल्याची संतप्त प्रतिक्रिया शहरात उमटत आहेत.दरम्यान याबाबत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरूण चौधरी यांनी जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात याप्रकरणी शहीदांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करीत पालिकेने केलेल्या कृत्याचा निषेध केला आहे. यासंदर्भात त्यांनी नगराध्यक्षांवरही थेट आरोप केला आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.
मयत नगरसेवकाच्या नावापुढे शहीदाचा उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 13:04 IST