नंदुरबार : लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले जिल्हा परिषद सदस्य भरत माणिकराव गावीत यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केलेली असतांनाच शुक्रवारी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकारण ढवळून निघाले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळली आहे. दरम्यान, २ एप्रिल रोजी भरत गावीत यांनी कार्यकर्ता मेळाव्यात जो निर्णय होईल तो मान्य राहील अशी भुमिका घेतली आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी आमदार अॅड.के.सी.पाडवी व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य तथा माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत इच्छूक होते. काँग्रेसने आमदार अॅड.के.सी.पाडवी यांची उमेदवारी जाहीर केल्याने भरत गावीत हे नाराज आहेत. त्यांनी याबाबत भुमिका स्पष्ट केली आहे. नऊ वेळा खासदार म्हणून निवडून येवूनही आणि गेल्या निवडणुकीत केवळ मोदी लाटेमुळे पराभूत झालेल्या माणिकराव गावीत यांचा मान राखला गेला नाही असे सांगत कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी म्हणून गळ घातली आहे. त्यांच्या मताचा आदर राखत आपण मेळावा घेणार आहोत. आधी ३० मार्च रोजी मेळावा निश्चित करण्यात आला होता, परंतु आता २ एप्रिल रोजी हा मेळावा घेण्याचे ठरविण्यात आल्याचे भरत गावीत यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान माणिकराव गावीत पुत्रासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा शुक्रवारी सकाळपासून सुरू झाली. जिल्हाभरात आणि सोशल मिडियावर त्याबाबत चर्चेला उत आला होता. परंतु माणिकराव गावीत यांनी या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. आपण काँग्रेसशी एकनिष्ठ आहोत. या कारणावरून पक्ष बदलाचे शक्यच नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, भरत गावीत यांनी अपक्ष लढण्याच्या निर्णयाबाबत अद्यापही स्पष्ट भुमिका घेतलेली नाही. २ एप्रिल रोजी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला आहे. सर्व विधानसभा मतदारसंघातील आपल्याला मानणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते येणार आहेत. त्यावेळी जो निर्णय होईल तो मान्य राहील असेही भरत गावीत यांनी स्पष्ट केले आहे
माणिकराव गावीतांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:24 IST