अक्कलकुवा : शहरालगतच्या सोरापाडा येथील महाकाली मातेच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे़ मंगळवापासून यात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून यात्रेचे यंदाचे ९९ वे वर्ष आहे़ खासकरुन पशुबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या यात्रोत्सवात यंदा चार हजार बैल विक्रीसाठी दाखल होणार असल्याने बाजार समितीकडून विविध सोयी सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत़काठी संस्थानचे तत्त्कालीन चिप्टन इस्टेट राजे रणजितसिंग सुरजसिंग पाडवी यांच्या नवसपूर्तीनंतर १९२० साली सोरापाडा येथे देवीचे मंदिर उभारण्यात आले होते़ यातून त्यांच्या पुढाकाराने त्याच वर्षापासून माघ शुद्ध पौर्णिमेला यात्रोत्सव आयोजनाचे निर्धारित करण्यात आले होते़ त्यानुसार ९९ वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे़ मंदिर परिसराच्या १२ एकर जागेत होणाऱ्या यात्रोत्सवात बैलबाजारास पशुमेळा भरवण्याची परंपरा आहे़ सोबतच लाकडी व लोखंडी बैलगाड्यांची विक्रीही याठिकाणी होत असल्याने शेतकºयांसाठी हा यात्रोत्सव महत्त्वपूर्ण मानला जातो़ १०० वर्षांची परंपरा असलेल्या या मंदिरात नवसपूर्तीसाठी शेकडोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते़ मंगळवारपासून याठिकाणी दाखल होणाºया भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत़ यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक उपक्रमही होणार आहेत़ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार डॉ़ नरेंद्र पाडवी, उपाध्यक्ष पृथ्वीसिंग पाडवी यांच्यासह २१ सदस्यीय समिती यांच्या मार्गदर्शनात हा यात्रोत्सव होत आहे़
अक्कलकुव्यात महाकाली मातेचा यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:17 IST