नंदूरबार- खून झालेली तरुणी व संशयित या दोघांमध्ये केवळ मोबाईलवरून प्रेम जुळल्याचे समोर आले आहे. विनयकुमार याला सीताकुमारीचा मोबाईल नंबर मिळाला होता. त्यावरून त्याने तिला सहज फोन लावला असता, तिने त्याला चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांच्यात फोनवर बोलणे वाढले. त्यातून प्रेम झाले. तिने त्याच्याकडे सुरत येथे येण्यासाठी तगादा लावला. त्यासाठी त्याने २० हजार रुपये तिच्या बँक खात्यात टाकून सुरतला आणले. परंतु तेथे गेल्यावर विनयकुमार हा विवाहित असून, त्याला तीन मुलंदेखील असल्याचे समजल्यावर त्यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे सीताकुमारी त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावत होती.
असा केला खून
सीताकुमारीपासून कायमची सुटका मिळावी, या विचारात विनयकुमार राय होता. तिला गावी जाऊन राहा, नंतर लग्न करू असे सांगून गावी जाण्यासाठी भुसावळपर्यंत सुरत-भुसावळ पॅसेंजरने दोघे निघाले. या प्रवासात त्यांच्यात सारखे भांडण सुरू होते. त्यामुळे रात्री दहा वाजता पॅसेंजर ढेकवद स्थानकात आली असता तो खाली उतरला, त्याच्यामागे सीताकुमारीही उतरली. दोघे पायीच नंदूरबारच्या दिशेने निघाले. पोचाराबारी स्थानक पार केल्यानंतर ते बिलाडीमार्गे नंदूरबारकडेे येत होते. बिलाडी शिवारातच रेल्वे रुळाजवळ त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यावेळी संतापाच्या भरात विनयकुमार याने त्याच्या खिशात असलेल्या टेक्स्टाईल मिलमध्ये धागा कापण्याच्या ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले. सीताकुमारी मृत झाल्याचे लक्षात आल्यावर तो नंदूरबार स्थानकात आला आणि तेथून परत सुरत येथे पोहचला. नंतर काही झालेच नाही असे दाखवून तो नियमित आपल्या कामाला लागला.
यांनी केली कामगिरी...
खुनाच्या घटनेचा कुठलाही धागादोरा नसताना एलसीबीच्या पथकाने या घटनेचा उलगडा केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर, हवालदार प्रमोद सोनवणे, सुनील पाडवी, बापू बागुल, मनोज नाईक, किरण मोरे, यशोदीप ओगले, सतीश घुले यांच्या पथकाने केली.