नंदुरबार : कार्यालयीन कामकाज करीत असताना अनेक कर्मचारी बहुतांश वेळ मोबाईलवर बोलत असतात. शिवाय काहीजण तर सोशल मीडियावर सक्रिय असतात. कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरासंदर्भात आचारसंहिता असतांना त्याचे कुठल्याही शासकीय कार्यालयात पालन होत नसल्याची स्थिती आहे.
या संदर्भात ‘लोकमत’ने केलेल्या पहाणीत ही बाब प्रकर्षाने आढळून आली. अनेक वेळा तर काही कर्मचाऱ्यांसमोर लोकं कामे घेऊन आलेली असतात, ते बसलेले असतांना देखील कर्मचारी मोबाईलमध्ये बोलण्यात आणि सोशल मीडियावर व्यस्त असतो. त्यामुळे काम घेऊन येणारा कंटाळून जातो. ही बाब लक्षात घेता कार्यालयीन कामकाजाच्या वेळी मोबाईलची आचारसंहिता राबविणे गरजेचे आहे.
कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा.कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच मोबाईलचा वापर करावा. मोबाईलवर सौम्य आवाजात बोलावे. वाद घालू नये. कार्यालयीन वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. मोबाईलवर आलेले अत्यावश्यक वैयक्तीक कॉल बाहेर जाऊन घ्यावेत.