समितीने विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील विविध प्रकल्प, कामे व योजनेबाबत माहिती घेतली.
पोषण पुनर्वसन केंद्राला भेट
तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात बालकांना अधिक संख्येत दाखल केले जात नसल्याची तक्रार आल्याचे यावेळी समिती सदस्यांनी सांगितले. बालकांसाठी पोषण केंद्रात अधिक व्यवस्था वाढविण्यात याव्यात असे सांगून सदस्यांनी बालक व मातांची विचारणा करून तेथील आहार व सुविधांविषयी माहिती घेतली.
आहार, सुविधा, स्वच्छता याविषयी माहिती जाणून घेतली होती. मातांनी चांगला व पुरेसा आहार मिळत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर कुपोषित बालकांच्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सोयाबीनचा समावेश करण्याची सूचना आरोग्य प्रशासनाला देण्यात आल्या.
पाच टक्के निधीची विचारणा
तळोदा पालिकेला दरवर्षी शासनाकडून मिळणाऱ्या महिला व बालकल्याणबाबतच्या पाच टक्के निधीची माहिती कर्मचाऱ्यांकडून घेतली. हा निधी कसा व कोणकोणत्या कार्यक्रमावर आतापर्यंत खर्च करण्यात आला असल्याची माहिती जाणून घेतली. त्यावेळी पालिकेने खर्चाचे विवरण दिले. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रभारी मुख्याधिकारी अनंत जवादवार, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, लेखापाल विशाल माळी व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
समितीने तालुक्यातील लोभाणी येथील मुलींच्या शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन बंदद्वार चर्चा केली. येथील भौतिक सुविधांबाबत मुलींची तक्रार नसली तरी विज्ञान शिक्षक नसल्याने आमचे नुकसान होत असल्याचे सांगितले. सेंट्रल किचनच्या आहाराची तपासणी केली असता पोळ्या निकृष्ट दर्जाच्या आढळून आल्याने नाराजी व्यक्त करून यात सुधारणा करण्याची सूचना दिली.