नंदुरबार : पावसाळ्यात परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणे काही वर्षांपूर्वी त्रासदायक ठरत होते. गळक्या आणि तुटक्या बसेस हैराण करत होत्या. परंतु नंदुरबार आगाराने यावर उपाययोजना करून सर्व बसेस सुस्थितीत आणल्या आहेत. यातून प्रवाशांना यंदाचा पावसाळा हा सुखकर ठरत आहे.
नंदुरबार आगारातून अद्यापही पूर्ण क्षमतेने बसेस सुरू केलेल्या नाहीत. दर दिवशी ४७४ फेऱ्या सध्या आगारातून होत आहेत. यातून उत्पन्न वाढत आहे. आगाराकडे एकूण ११५ बसेस आहेत. या सर्व बसेस या नित्यनेमाने दुरुस्त करण्यात येत असल्याने प्रवाशांना होणारा त्रास कमी झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बसेसमध्ये प्रवाशांचीही गर्दी होत असल्याचे दिसून आले.
एसटीचा प्रवास सुखकर
लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी एसटीलाच प्राधान्य देतो. सुरक्षित असा प्रवास एसटीचा असतो. सध्या बसेस चांगल्या आहेत. लांब अंतर पार करतील अशी स्थिती आहे.
- योगेश पाटील, नंदुरबार
पावसाळ्यात एसटीतून प्रवास करायला बहुदा टाळत होतो. परंतु आता जागाही मिळत असून गळक्या बसेस काढून टाकल्याने बस प्रवासाला प्राधान्य देत आहे.
- रवींद्र जाधव, नंदुरबार
गळक्या गाड्यांची योग्य दुरुस्ती केली आहे. खिडक्या दुरुस्त केल्या आहेत. योग्य त्या पद्धतीने सीटही दुरुस्त केल्या आहेत. प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी उपाययोजना केल्या आहेत.
- मनोज पवार, आगार प्रमुख.
कोरोना काळात झाल्या दुरुस्त्या
n कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एसटी बंद होती. परंतु आगाराचे कामकाज सुरू होते. यांत्रिक शाळेतील सर्व कामगार यांनी चालक-वाहकांच्या सूचनांमधून बसेस दुरुस्त करून घेतल्या.
n बहुतांश बसेस या नव्याच होत्या. त्यांच्या सुशोभिकरणासाठी किरकोळ खर्च आल्याची माहिती देण्यात आली आहे. बसेस या सुस्थितीत धावत असल्या तरी, त्यांची नित्याने तपासणी करण्यात येत असल्याची माहिती दिली गेली.