नंदुरबार : नंदुरबारला जोडणाऱ्या तीन रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये आता विनाआरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. विशेष म्हणजे दररोज धावणाऱ्या या प्रवासी गाड्या आहेत.
कोरोनामुळे गेल्या महिन्यापर्यंत मोजक्याच प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. आता मात्र अनेक गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली होती. परंतु यातील सर्वच गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत होते. ही बाब लक्षात घेता आता रेल्वे प्रशासनाने काही गाड्या सुरू करून त्यात विनाआरक्षण प्रवास करण्यास मुभा दिली आहे.
या गाड्यांमध्ये नंदुरबार-भुसावळ पॅसेंजर, नंदुरबार-उधना मेमू ट्रेन व सुरत-भुसावळ पॅसेंजर यांचा समावेश आहे. नंदुरबार-भुसावळ ट्रेनचा नंबर हा ०९०७७/०९०७८ आहे. सुरत-भुसावळ पॅसेंजरचा नंबर ०९००७/०९००८ असा आहे. उधना-नंदुरबार प्रवासी ट्रेनचा नंबर ०९३७७/०९३७८ असा आहे. यामुळे खान्देशातील प्रवाशांना मोठे सोयीचे होणार आहे. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने तसेच केवळ आरक्षणातूनच प्रवास होत असल्याने खासगी लक्झरी वाहनांद्वारे प्रवास सुरू होता.