ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील जवखेडा ते भागापूरदरम्यान गेल्या वर्षी झालेले रस्ता काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. त्यामुळे अवघ्या वर्षभरातच रस्त्याचे तीनतेरा वाजल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. परंतु दुसऱ्या पावसानंतरदेखील रस्ता हळूहळू खचून गायब होण्याचा मार्गावर आला असून, शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वेळीच यावर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
भागापूरहून जवखेडा जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचा असलेला रस्त्या नादुरुस्त असल्याकारणाने शेतकऱ्यांना शेतमाल घेऊन जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु संबंधित ठेकेदारांच्या व अभियंत्यांचा संगनमताने यामध्ये डांबराचा जास्त वापर न करता केवळ खडी अंथरण्याचे काम केले गेले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यामुळे मागील वर्षी केलेला रस्ता पहिल्याच वेळेला आलेल्या पावसात उखडल्याचे दिसून आले. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा आरोप केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच संबंधित ठेकेदाराने खचलेल्या रस्त्याची थातूर-मातूर डागडुजी केली होती. परंतु पुन्हा पावसाळ्यात तो खचला असून, यावरून हे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे याचे पितळ उघडे पडले आहे. त्यातच हुलकावणीनंतर परत पावसाने दमदार हजेरी लावल्याने हा रस्ता पूर्णतः गायब होण्याच्या मार्गावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतमाल घेऊन जाण्यास नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तरी संबंधित रस्त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करीत रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
गेल्या वर्षी भागापूरहून जवखेडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत करण्यात आले होते. परंतु संबंधित ठेकेदाराने रस्ता काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने रस्ता वारंवार खचून जात असून, ग्रामस्थांबरोबरच शेतकऱ्यांना शेतमाल घेऊन जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या रस्ता कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येऊन रस्ता दुरुस्ती करून द्यावा.
- रमेश शिवा पवार, सरपंच, भागापूर, ता. शहादा