n लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा पोलीस ठाण्याच्या विभाजनासह जिल्ह्यात नवीन तीन पोलीस ठाण्यांची निर्मीती करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. सारंगखेडा घटनेचा जलद निकालासाठी केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असे सांगून पोलीस दल ‘एक आरोपी एक पोलीस’ उपक्रम स्तूत्य असून राज्यातही तो राबविला जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहादा येथे आढावा बैठकीत बोलतांना सांगितले.शहादा तहसिल कार्यालयात कोविड-१९ आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्य्वस्थेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहे.अशा प्रकरणात गुन्हेगाराना कडक शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सारंगखेडा येथील प्रकरणात तज्ज्ञ वकीलाचे सहकार्य घेण्यात येईल. त्यासाठी पोलीसांनी आवश्यक प्रस्ताव सादर करावा. नंदुरबार हा सीमावर्ती जिल्हा असल्याने पोलीसावर अधिक जबाबदारी आहे. नवापूर आणि शहादा पोलीसस्टेशनचा प्रश्न लवकरमार्गी लावण्यात येईल. नंदुरबार पोलीसदलाचा ‘एक आरोपी एक पोलीस’ उपक्रम स्तुत्य असून हा उपक्रम राज्यात सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कोरोना योद्ध्यांवर होणारे हल्ले दुर्देवी असून असे प्रकार करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी.कोविडसारख्या संकटात जिल्हा प्रशासनाने चांगली कामगिरी केलेली आहे. जिल्ह्याने पालकमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यापूर्ण उपक्रमही राबविले त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात आल्याचे दिसत असले तरी येत्या काळात दक्षता बाळगण्याची गरज आहे. युरोपात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने परीस्थिती बिकट झाली आहे. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे टेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पोलीस दलाने कोरोनाकाळात चांगली कामगिरी केली असल्याचे देशमुख म्हणाले.पालकमंत्री पाडवी म्हणाले, जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधाबाबत चांगली कामगिरी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील चांगले सहकार्य केले. पोलीस दलाने आपली भूमिका योग्यप्रकारे बजावली. पोलीसाच्या निवासाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. महिला विषयक गुन्हे करणाऱ्यावर कडक कारवाई झाल्यास समाजात चांगले संदेश जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधासाठी सर्वानी मिळून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही ॲड.पाडवी म्हणाले.यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील प्रश्नाविषयी चर्चा केली. जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनेबाबत आणि पोलीस अधीक्षक पंडीत यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत सादरीकरण केले.
जिल्ह्यातील नवीन तीन पोलीस ठाण्यांचा प्रश्न मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 12:30 IST