शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याचे काम अगदी नियोजनबद्ध पद्धतीने केले. त्यात ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण दिल्लीतील संस्थेने केले होते. पंचायत समितीमार्फत गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, ग्रामविस्तार अधिकारी सुरेश देवरे, निकुंभ यांच्या उपस्थितीत आयएसओ मानांकनाचे सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, न्हानभो भील, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. सारंगखेडा ग्रामपंचायत ही सर्व निकषांवर खरी उतरली आहे. आयएसओ पथकाने केलेल्या पाहणीत ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, नियमित दप्तर आर्थिक तपासणी, प्रत्येक कक्षाची मांडणी, गावाची स्वच्छता, रस्ते, अंगणवाड्या, शैक्षणिक व आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदींसह मूलभूत सोयी-सुविधांची पाहणी करून गुणांकन ठरवले. ग्रामपंचायतीने विकासाचा टप्पा गाठत सर्वेक्षणात गुणात्मक पातळीवर आघाडी घेतली आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या मार्गदर्शनामुळे गाव विकासाच्या वाटेवर असून, गावाच्या विकसित वाटचालीसाठी लोकसहभागही महत्त्वाचा आहे, असे सरपंच पृथ्वीराजसिंह रावल यांनी सांगितले.
सारंगखेडा ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST