नंदुरबार : लूटमार करणाऱ्या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून अक्कलकुवा येथील चोरीच्या घटनेचा तपास लवकर लावून विविध उपाययोजना करण्याची मागणी जिल्हा व्यापारी महासंघाने केली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांना हे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात, अक्कलकुवा येथे व्यापाऱ्याची लूट झाल्याची घटना घडली होती. घटनेला आठवड्याचा कालावधी लोटला आहे. अद्याप काहीच तपास लागला नाही. या घटनेनंतर जिल्ह्यातील व्यापारी पूर्ण धास्तावलेले आहेत. व्यापाऱ्यांचा जीव व अर्थचक्राची सुरक्षा धोक्यात आली आहे. गतकाळात लुटमारीच्या घटनेनंतर प्रशासनाने विविध योजना राबविल्या होत्या. रस्त्या-रस्त्यावर पेट्रोलिंग, संशयितांवर कार्यवाही, गुन्हे रेकार्ड असलेल्या व्यक्ती व समूहावर वॉच ठेवून गुन्हेगारांवर नियंत्रण आणले होते. अक्कलकुवा येथे झालेली चोरीचा छडा लावून चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा व्यापारी महासंघ, हाटदरवाजा किराणा व्यापारी असोसिएशन नंदुरबार, मंगल बाजार किराणा व्यापारी असोसिएशन,शहादा, नवापूर, तळोदा व अक्कलकुवा किराणा व्यापारी असोसिएशन, नंदुरबार व्यापारी असोसिएशन, जळका बाजार व्यापारी असोसिएशन, जिल्हा कापड व्यापारी असोसिएशन आदींनी हे निवेदन दिले आहे.