सातपुडा एक्सप्रेस ठरलेल्या किसन तडवी याच्या बर्डी गावापासून काही अंतरावर असलेल्या बालाघाट, ता.अक्कलकुवा येथील अनिल वसावे या युवकाला गिर्यारोहकांची आंतरराष्ट्रीय संधी मिळाली. त्याने काही नातेवाईक व मित्रांच्या सहकार्याने या संधीचे सोने करीत आफ्रिकेतील सर्वात उंच किलिमांजारो हे शिखर सर केले. त्यानंतर पुन्हा युरोपमधील उंच शिखर माऊंट एल्ब्रस हेदेखील त्याने सर करुन विक्रम नोंदविला आहे. त्याच्या या विक्रमाची दखल घेत ३६० बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाय रेंज ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड, इंडियन व नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे.
सातपुड्याच्या सान्निध्यात वाढलेल्या अनिलने बालाघाटचे ग्रामस्थ व मित्रांच्या सहकार्याने दोन्ही विक्रमाला गवसणी घातली. परंतु पुन्हा जागतिक स्तरावरील काही उंच शिखरांवरदेखील तिरंगा फडकवायचे स्वप्न त्याने बाळगले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला आज आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता भासू लागली आहे. मुळात वसावे परिवाराची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच परंतु आलेली संधी न दवडता त्याच्यात नव्या स्वप्नांनी घर केले. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना त्याला अनेक आर्थिक अडचणी आल्याच. परंतु त्याचा किंचीतही विचार न करता आपली वाटचाल सुरुच ठेवली.
पुन्हा पुढील स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेलद्वारे पत्र पाठवले आहे. त्यात अनिलने संकटात असल्याचे नमूद केले आहे. त्याच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अनिलच्या विक्रमात योगदान द्यावे, अशी अपेक्षाही सातपुडावासीयांनी व्यक्त केली आहे.