येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात बुधवारी तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या कामांच्या अढाव्यासाठी बैठक घेण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार गिरीश वाखारे होते. यावेळी गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बी. के. पाटील उपस्थित होते. प्रारंभी ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. ग्रामरोजगार सेवकांनी याबाबत माहिती दिली. विशेषत: रोहयोची ग्रामपंचायतनिहाय कामांचे उद्दिष्ट व झालेले साध्य या विषयी तहसीलदारांनी रोजगार सेवक यांच्याकडून माहिती घेतली. बरेच उद्दिष्ट सध्या झाल्याची माहिती देण्यात आली. रोजगार सेवकांचा मस्टर पेंडिंग राहत असल्यामुळे मजुरांनाही मजुरी मिळण्यास विलंब होत असतो. त्यामुळे मस्टरची कार्यवाही लवकर करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी ग्राम रोजगार सेवकांना अडचणी येत असल्याचे सांगितले. वास्तविक रोहयोच्या कामावर केलेली मजुरी मजुरांना वेळेवर मिळत नसल्यामुळे मजूरवर्गही या कामांकडे पाठ फिरवत असतात. त्यामुळे निदान याबाबत तरी ग्राम रोजगार सेवक व प्रशासन यांनी समन्वय राखण्याची आवश्यकता आहे. घरकुलांचे अपूर्ण कामे लाभार्थ्यांकडून युद्धपातळीवर करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर सेल्फवरील कामे ग्रामपंचायतीच्या उद्दिष्ट व आरखड्यानुसार घेण्याची सूचना देण्यात आली. ग्रामसेवक मधुकर कापुरे यांनी सूत्रसंचालन केले. बैठकीस सर्व तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.
समृद्ध बजेटची प्रभावी अंमलबजावणी करा
राज्य शासनाने यंदापासून रोजगार हमीच्या योजनेत समृद्ध महाराष्ट्र, लक्षाधीश लाभार्थी या उपक्रमांअंतर्गत बजेट निर्धारीत केला आहे. त्यात ग्रामीण खेडे गावातील अनेक कामे घेण्यात येणार आहे. शिवाय पूर्वी लाभार्थ्यांनी प्रशासनाकडे कामे मागायची गरज होती. आता या नवीन समृद्धी बजेटनुसार शासनच स्वतः लाभार्थ्यांना काम उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन व रोजगार सेवकांची जबाबदारी वाढली असून, त्यांनी ठोस प्रयत्न करण्याची सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
एक सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन
रोजगार हमी योजनेची ग्रामपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांची गेल्या मार्च महिन्यापासूनचे मानधन थकले आहे. साहजिकच त्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. नियमित मानधनाबाबत शासनस्तरावर नेहमी पाठपुरावा केला जात असतो तरीही याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे थकीत मानधन, प्रवासभत्ता, जॉबकार्ड, मस्टर फॉर्म लवकर द्यावे. अन्यथा १ सप्टेंबरपासून ‘काम बंद आंदोलन’ छेडण्याचा इशारा रूपसिंग चौधरी, संजय ठाकरे, रायसिंग पाडवी, कुशल पावरा, शांताराम पाडवी, प्रकाश ठाकरे, गेंदु वसावे, राजेंद्र वळवी, हिरालाल पाडवी, देवीदास जांभोरे, अजय पवार, मगन पाडवी, जिऱ्या वर्ती, महेंद्र वळवी, यशवंत पाडवी, रवींद्र मोरे, छोटू पोटे, विलास पाडवी, पवन वळवी, मुवर्या वसावे, बाजीराव पटले, देवा भीलाव यांनी दिला आहे.