तालुक्यातील भोरटेक, ओझर्टा, चिखली खुर्द, जाम,वाघर्डे, जावदे त.ह. परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. १५ ते २० मिनिटे झालेल्या पावसादरम्यान अतोनात नुकसान झाले आहे. गावातील नागरिकांनी लागलीच आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लागलीच शहादा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना सूचना देऊन त्वरित पाहणी करण्यास सांगितले. सायंकाळी उशिरा तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन तलाठी यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले.
सोमवारी आमदार राजेश पाडवी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आमदार पाडवी यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधत नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करा, असे निर्देश प्रशासनाला दिले. जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून माहिती देऊन तत्काळ मदत देण्याची विनंती केली. त्याचसोबत कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनाही पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार पाडवी यांनी सांगितले की, वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान झाले आहे. ज्यांचे कोणाचे नुकसान झाले असेल त्यांनी आपल्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना कळवून लागलीच पंचनामा करून घ्यावा. तसेच विजेचे खांब पडून तारा तुटल्याने वीज वितरण कंपनीचे अधिकारी अभियंता मिलिंद ठाकूर यांना लवकरच नवीन खांब व तारा बसवून विद्युत प्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोणाला काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान झाले असेल तर आपणही संबंधित तलाठी यांना संपर्क साधून पंचनामे करून घ्यावे, असे आमदार पाडवी यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील चव्हाण, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, सरपंच गोपाल पावरा, सुभाष वाघ, दिलवरसिंग पवार, प्रवीण वळवी, कल्पेश राजपूत, हेमराज पवार आदी उपस्थित होते.