रविवारी दुपारच्या सुमारास सुमारे साडेसात एकर परिसरात अफूची शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे व पथकाने धाड टाकून कारवाई सुरू केली. सोमवारी सकाळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत परिसरातील ५० मजुरांच्या मदतीने दोन्ही क्षेत्रांतील अफूचे पीक कापणीला सुरुवात करण्यात येऊन कारवाईला सुरुवात करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी सकाळपर्यंत सुरू राहणार असून, त्यानंतरच प्रत्यक्षात या साडेसात एकरातून किती किलो अफूचे उत्पादन झाले, हे स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही शेतांचे मालक यांना ताब्यात घेतले होते. रात्री अधिक चौकशी केली असता, ज्या मेंढपाळांनी ही शेती भाडेपट्ट्याने घेतली होती, त्यापैकी चार मेंढपाळांना पोलिसांनी पाडळदा, ता.शहादा येथून ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मेंढपाळांची परिस्थिती पाहता, यामागे आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता बळावली असून, मुख्य सूत्रधाराच्या मार्गदर्शनानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात अफूचे उत्पादन घेतले जात होते. या प्रकरणातील मास्टर माइंड अद्याप कारवाईच्या कक्षेबाहेर असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे चार महिन्यांपूर्वी मेंढपाळांची वस्ती गावात मेंढ्यांच्या साथीने वसाहतीला आली होती. यातील दोन मेंढपाळांनी सुमारे एक लाख रुपये देऊन ही शेती चार महिन्यांसाठी घेतली. आदिवासी शेतकऱ्यांना आम्ही येथे खसखस या मसाल्याच्या पिकाची शेती करणार असून, चार महिन्यांनंतर तुमचे शेत मोकळे करतो, तुम्हाला शेताचा ताबा दिला जाईल, असे सांगितले. खसखस हे पीक मसाल्यात वापरले जात असल्याचे व आदिवासी शेतकऱ्यांना याबाबतचे ज्ञान नसल्याने, या मेंढपाळांनी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन येथे अफूची शेती केली. कालांतराने ही बाब आपसातील संघर्षातून उघडकीस आली आणि पोलिसांपर्यंत पोहोचली व त्यानंतर हा धंदा उघडकीस आला.