नवापूर चाैफुलीपासून तळोदा रोड हा मार्ग सध्या शेवाळी-नेत्रंग महामार्ग म्हणून सर्वश्रुत आहे. या मार्गाने सध्या वाहतूक सुरु आहे. महामार्ग असल्याने साहाजिकच वाहतूक वाढली आहे. परंतू महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून हे खड्डे अपघातांना आमंत्रण देणारे ठरत आहेत. मार्गावर नवापूर चौफुली ते करण चौफुली पर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत, या खड्ड्यांमध्ये रोज अपघात घडतात. काही खड्ड्यांमुळे तर मृत्यू देखील घडले आहेत. खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान होते. हे खड्डे अनेक वर्षांपासून जसेच्या तसेच आहेत किंबहुना या खड्ड्यांची खोली आणि रुंदी मागील एक ते दीड वर्षात वाढली आहे. परंतु महामार्ग विभाग डागडुजी किंवा दुरूस्तीही करत नसल्याचे समोर आले आहे. या खड्ड्यांमुळे भविष्यात होणारे अपघात टाळावेत यासाठी सदर महामार्ग विभागाच्या प्रशासनाचा प्रतिकात्मक पुतळा धुळे चौफुली वरील खड्ड्यांमध्ये गाडण्यात आला.
दरम्यान धुळे चौफुली वरील महामार्गावरून पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी योचे येणे-जाणे सुरु असते. तरीही रस्त्याची दुरुस्ती का होत नाही. या खड्ड्यांची येत्या आठ ते दहा दिवसात दुरुस्ती न झाल्यास नागरीकांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय राजपूत यांनी दिली आहे.