नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध सातपुड्यात व्यावसायिक प्रवृत्तीचा शिरकाव झाल्यामुळे सातपुडा बोडका झाला. परंतु धडगाव तालुक्यातील असली व अस्तंबा भागातील जंगल मात्र त्याला अपवाद ठरते. झाडांचे संगोपन व संवर्धनासाठी आदिवासी विकास मंत्र्यांचे वडील चांद्याबाबा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. दक्ष ग्रामस्थांमुळे या भागात पर्यावरणास हानिकारक प्रवृत्तीचा शिरकाव होऊ शकला नाही, कुऱ्हाडबंदी नियमांची अंमलबजावणी केल्याने वर्षानुवर्षे वाढलेल्या झुडूपांसह मोठी झाडेही चांगली वाढली आहे. परिणामी असलीचे नैसर्गिक सौंदर्य आजही शाबूत आहे. एवढेच नव्हे तर तेथील वन उपजही कायम आहे. जंगलाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखला गेल्याने असली गावासह परिसरात दुष्काळ व उष्ण तापमान अशा मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या समस्या उद्भवत नाही. यात चांद्याबाबा पाडवी यांची भूमिका महत्त्वाची ठरते. असे असतानाही ग्रामपंचायतीने नागरिकांच्या श्रमदानातून महू व चारोळीचे ३ हजार ५३० तर आंब्याची ३ हजार ४०० अशी एकूण ६ हजार ९३० झाडांची लागवड केली.
अर्थचक्राला मिळेल बळकटी
यंदाच्या वृक्षलागवडीत महू, चारोळी व आंब्याचा समावेश आहे. त्यातील महूचे झाड आदिवासींसाठी कल्पवृक्ष ठरत असल्याने या नव्या रोपट्याचा भविष्यात मोठा आधार लाभणार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होऊन दरडोई उत्पन्न वाढेल व रोजगार उपलब्ध होईल. तर चारोळी व आंबा ही झाडे आदिवासींच्या अर्थचक्राला आकार देणारे असून भविष्यातील आर्थिक अडचणी दूर होणार आहे. यासह प्राकृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे.
'असली'च्या जंगल संवर्धनात मोलाची भूमिका घेणारे चांद्याबाबा पाडवी यांनी पर्यावरणाचा समतोल ढळू दिला नाही. शिवाय त्यांनी परंपरेतील पोशाख न बदलता आदिवासी संस्कृतीची ओळख शाबूत ठेवली, याबद्दल नुकताच आदिवासी एकता परिषदेने मोख ता. धडगाव येथील कार्यक्रमात त्यांचा गौरव केला.
वृक्षलागवड व वाटपप्रसंगी पंचायत समिती सदस्य गीता चांद्या पाडवी, चांद्या बाबा पाडवी, ग्रामपंचायत प्रशासक सी.डी राठोड, ग्रामसेवक विवेक नागरे, छगन पाडवी, गोमा वळवी, दित्या वळवी, धना वळवी, गणेश पाडवी, मोतीराम वळवी, किरसिंग वळवी,किसन वळवी. वन्या वळवी, राज्या वळवी, निता पाटील, शिक्षक गावित व ग्रामस्थ उपस्थित होते.